शहाद्यात बोगस खताच्या अड्ड्यावर कृषी विभागाची धाड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, सराईत आरोपीला बेड्या

शहाद्यात बोगस खताच्या अड्ड्यावर कृषी विभागाची धाड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, सराईत आरोपीला बेड्या

(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक
प्रा. डी. सी. पाटील )

शहादा :  नंदुरबार जिल्हा कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने शहादा येथे मोठी कारवाई केली आहे. रासायनिक खताचे अनधिकृत उत्पादन व विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या अड्ड्यावर छापा टाकत सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 29 जुलै 2026 रोजी आदिनाथ पार्क शिवारातील 5 क्रमांकाच्या रो-हाऊसमध्ये ही धाड टाकण्यात आली. यावेळी धनंजय विनायक पाटील (रा. शिरूर, ता. जि. धुळे, सध्या रा. शिवसकर कॉलनी, शहादा) हा अनधिकृतपणे रासायनिक खताचे उत्पादन व विक्री करताना रंगेहाथ पकडला गेला. कारवाईदरम्यान विविध प्रकारचे रासायनिक खत व उत्पादनासाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण अंदाजे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी धनंजय पाटील हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही दि. 19 एप्रिल 2026 रोजी अनधिकृत खतसाठा प्रकरणी त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तरीही त्याने पुन्हा बोगस खतनिर्मितीचा व्यवसाय सुरू ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) विशाल वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी किशोर हडपे आणि तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) उल्हास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्निल शेळके, कृषी अधिकारी अभय कोर व कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) विशाल वाकचौरे यांच्यासह अधिकारी सहभागी होते.

दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व कृषी विकास अधिकारी किशोर हडपे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, अज्ञात व्यक्तींकडून घरपोच खत पुरवठ्याच्या आमिषाला बळी पडू नये. खतांची खरेदी केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडून स्वतः उपस्थित राहून करावी आणि खरेदीची अधिकृत पावती घ्यावी.
Previous Post Next Post