प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी कन्येची मोठी झेप; डॉ. स्नेहा भायकट्टे यांची वैद्यकीय अधिकारी (Class 1) पदी निवड.
माहेमूद पिंजारी
तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर तालुक्यातील मौजे शेळगाव (नृसिंह) येथील कु. डॉ. स्नेहा माधवराव भायकट्टे यांची वैद्यकीय अधिकारी (Medical Officer – Class 1) पदी निवड झाल्याने संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाची सर्वत्र चर्चा होत आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. स्नेहा भायकट्टे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांचे वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई घरातील जबाबदाऱ्या सांभाळत मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ देत राहिल्या. त्यांचा एक भाऊ सध्या शिक्षण घेत आहे. अशा परिस्थितीतही डॉ. स्नेहा यांनी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि शिक्षणावरील दृढ विश्वास यांच्या जोरावर हे मानाचे यश संपादन केले. मौजे शेळगाव (नृसिंह), ता. देगलूर, जि. नांदेड येथील पहिल्या महिला Class 1 अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला असून, त्यांच्या यशामुळे गावाचे नाव अभिमानाने उज्ज्वल झाले आहे. डॉ. स्नेहा यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना, प्रतिकूल परिस्थितीतही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावकरी, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

