स्वत:चाच PUC फेल अन् दुसऱ्यांना दंड; नंदुरबार RTO च्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह!

स्वत:चाच PUC फेल अन् दुसऱ्यांना दंड; नंदुरबार RTO च्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह!

(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील )

शहादा : नियम शिकवणाऱ्यांनीच नियम पायदळी तुडवल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार बसस्थानक परिसरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या वाहनाची कागदपत्रे मुदतबाह्य असताना नागरिकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या RTO पथकाच्या कार्यपद्धतीवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शनिवारी, दि. 12 जुलै 2026 रोजी सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार बसस्थानक परिसरात RTO पथकाने वाहन तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत अनेक वाहनधारकांना दंड ठोठावण्यात आला. मात्र, या कारवाईची पद्धत आणि हेतूवरच नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.

नातेवाईकाला सोडणे गुन्हा आहे का?
प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वाहनांवर कारवाई करण्यात आली ती वाहने कोणतीही बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत नव्हती, तर केवळ आपल्या नातेवाईकांना बसस्थानकात सोडण्यासाठी आली होती. अशा वाहनांवरही चलन आकारले गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. "आता नातेवाईकांना बसस्थानकात सोडायचे तरी कसे? RTO ने याचे उत्तर द्यावे," अशी संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.

सर्वात मोठा गौप्यस्फोट : RTO चेच वाहन अनफिट!
या कारवाईत सर्वात गंभीर बाब समोर आली आहे ती म्हणजे, कारवाईसाठी वापरलेल्या शासकीय वाहनाचीच कागदपत्रे पूर्ण नसल्याचा आरोप. मिळालेल्या वाहन तपशीलानुसार, RTO पथकाने वापरलेल्या MH18 V 3173 या क्रमांकाच्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) 11 जून 2026 रोजीच संपले होते. म्हणजेच 12 जुलै रोजी केलेल्या कारवाईच्या वेळी तब्बल एक महिन्यापासून हे वाहन PUC शिवाय रस्त्यावर धावत होते.

मोटार वाहन कायद्यानुसार PUC नसलेले वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. मग हाच नियम RTO च्या वाहनाला लागू होत नाही का? स्वतःची गाडी नियमबाह्य ठेवून सामान्य जनतेकडून नियम पाळण्याची अपेक्षा करणे हा दुटप्पीपणा असल्याची टीका होत आहे.
नियम सर्वांसाठी समान हवेत. RTO ने आधी स्वतःच्या वाहनांचे कागदपत्र तपासावेत आणि मगच नागरिकांवर कारवाई करावी.

या प्रकरणामुळे RTO विभागाच्या प्रतिमेला तडा गेला असून, या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पथकावर कारवाई करण्याची मागणी प्रवासी महासंघ व स्थानिक नागरिकांनी विभागीय परिवहन अधिकारी, परिवहन आयुक्त आणि नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post