*बार्शीटाकळी MIDC मागणीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाची दखल; उद्योग विभागाकडे निवेदन पाठविले*
( अकोला जिल्हा विभागीय संपादक इमरान खान )
बार्शीटाकळी : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुका हा औद्योगिकदृष्ट्या मागास राहिलेला असून, आजूबाजूच्या मुर्तीजापूर, बाळापूर, तेल्हारा, अकोट, पातूर आणि अकोला या तालुक्यांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कार्यरत आहे. मात्र बार्शीटाकळी तालुक्यात अद्यापही MIDC नसल्यामुळे स्थानिक युवकांना रोजगारासाठी इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील वाढती बेरोजगारी आणि औद्योगिक विकासाचा अभाव लक्षात घेता बार्शीटाकळी येथे तातडीने MIDC मंजूर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अमोल भाऊ जामनिक यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवून केली होती.
या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालय आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेत संबंधित प्रकरण पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी उद्योग विभागाकडे पाठविले आहे. त्यामुळे बार्शीटाकळी तालुक्याच्या MIDC मागणीला शासन स्तरावर प्राथमिक मान्यता व सकारात्मक दखल मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अमोल भाऊ जामनिक यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, बार्शीटाकळी तालुक्याची लोकसंख्या मोठी असूनही औद्योगिक क्षेत्राचा विकास झालेला नाही. त्यामुळे सुशिक्षित युवक-युवतींसह अनेक नागरिकांना रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर , अमरावती यांसारख्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. तालुक्यात MIDC स्थापन झाल्यास हजारो स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल, नवीन उद्योगधंदे उभे राहतील, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल, व्यापारी, वाहतूक व्यवसाय, लघुउद्योजक आणि सेवा क्षेत्रालाही मोठा फायदा होईल. परिणामी संपूर्ण बार्शीटाकळी तालुक्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल.
याबाबत अमोल भाऊ जामनिक म्हणाले, "बार्शीटाकळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि युवकांच्या रोजगारासाठी MIDC ही काळाची गरज आहे. इतर तालुक्यांप्रमाणे बार्शीटाकळीलाही औद्योगिक विकासाचा अधिकार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाने माझ्या निवेदनाची दखल घेऊन ते उद्योग विभागाकडे पाठविल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत मी सातत्याने पाठपुरावा करणार असून, बार्शीटाकळीला MIDC मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील."
बार्शीटाकळी तालुक्यात MIDC मंजूर झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, स्थलांतराचे प्रमाण कमी होईल आणि संपूर्ण तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

