पारनेरसह नगर शहरातील दोन कत्तलखान्यांवर छापे; 62 गोवंशीय जनावरांची सुटका…पाच जणांविरुद्ध गुन्हे / स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.

पारनेरसह नगर शहरातील दोन कत्तलखान्यांवर छापे; 62 गोवंशीय जनावरांची सुटका…

पाच जणांविरुद्ध गुन्हे / स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.


अहिल्यानगर विभागीय संपादक/प्रशांत बाफना


अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पारनेर तालुक्यात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ठिकाणासह नगर शहरातील दोन कत्तलखान्यांवर छापे टाकले. या कारवाईत 62 गोवंशीय लहान जनावरांची सुटका करण्यात आली असून, एकूण तीन गुन्हे दाखल करत पाच आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने 4 ऑगस्ट रोजी पारनेर, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी छापेमारी केली.

पारनेरमध्ये 62 जनावरांची सुटका पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 62 गोवंशीय लहान जनावरांची सुटका करण्यात आली. सुमारे 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुलतान आयनूर मदारी आणि चिराग मदारी (दोघेही रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार आहेत.
नगर शहरातील दोन ठिकाणी कारवाई तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून 100 किलो गोमांस, दोन सत्तुर, दोन सुरे आणि इलेक्ट्रिक काटा असा सुमारे 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख मोहम्मद आवेझ याला अटक करण्यात आली असून बाबू कुरेशी हा फरार आहे.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत 60 किलो गोमांस, एक सत्तुर, एक सुरा आणि वजन काटा असा 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आदिल आमीन कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या तिन्ही कारवायांमध्ये मिळून 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंधक कायदा तसेच संबंधित भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच त्यांच्या पथकाने केली
Previous Post Next Post