*विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा एकदिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न...** देवळी तालुक्यात गावोगावी संघटन विस्ताराचा निर्धार; विविध ठिकाणी शाखा स्थापनेची घोषणा

*विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा एकदिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न...*

* देवळी तालुक्यात गावोगावी संघटन विस्ताराचा निर्धार; विविध ठिकाणी शाखा स्थापनेची घोषणा

देवळी प्रतिनिधी :
(रविंद्र पारीसे )

           देवळी शहरातील हनुमान मंदिर देवस्थान, एकपाळा येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती तथा दुर्गा वाहिनी यांच्या वतीने एकदिवसीय अभ्यासवर्ग कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अभ्यासवर्गाला महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.
         कार्यक्रमाच्या मंचावर विश्व हिंदू परिषद नेते अटल पांडे (वर्धा), शरद कोणप्रतिवार (वर्धा), दिनेश क्षीरसागर (देवळी) तसेच मोहन जोशी (देवळी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
          या एकदिवसीय अभ्यासवर्गात संघटनात्मक कार्यपद्धती, कार्यकर्त्यांची भूमिका तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्याचा प्रचार-प्रसार आणि संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना विश्व हिंदू परिषद नेते अटल पांडे यांनी संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने सक्रिय राहण्याचे आवाहन केले. तसेच संघटनेच्या विचारांचा व कार्याचा समाजाच्या विविध स्तरांपर्यंत प्रभावीपणे प्रचार-प्रसार करण्याबाबत मार्गदर्शन केले.
           देवळी तालुक्यातील विश्व हिंदू परिषद नेते दिनेश क्षीरसागर यांनी तालुक्यात संघटनात्मक विस्तारावर भर देत गावोगावी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या शाखा स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांच्यामध्ये सामाजिक व संघटनात्मक जाणीव निर्माण करण्यासाठी आगामी काळात व्यापक स्वरूपात कार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
           या कार्यक्रमात देवळी शहरातील मातृशक्ती आघाडीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच आंजी, अंदोरी, वरुड, गंगापूर, शिरपूर, पडेगाव, सेलसुरा, वडद व गौड आदी गावांमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी संबंधित शाखांच्या प्रमुखांच्या नियुक्त्यांची घोषणाही करण्यात आली.
          अभ्यासवर्गानंतर उपस्थित कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये परस्पर संवाद व संघटनात्मक समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.
           कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना मोहन जोशी यांनी केली, तर आभार प्रदर्शन गोल्डी बग्गा यांनी केले.
           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन महल्ले, प्रवीण तेलरांधे, गजानन मेंडूले, रुपेश गाठे, दीपक कामडी, वैभव झाडे, रुपेश वानखेडे, शुभम कैकाडी, चेतन सुरकार, सौरभ कामडी, रविंद्र पोटदुखे, मंगेश धोटे, लक्ष्मण इंगोले, तुकाराम कामडी, अश्विनी जोशी, आशा कुहाटे, सविता कापसे, संगीता पट्टे यांच्यासह महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
         या अभ्यासवर्गाला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती तथा दुर्गा वाहिनीचे महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे देवळी तालुक्यात संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.
Previous Post Next Post