आता उसावर पायरीला किडीचे संकट…!; बळीराजा वरील संकटांची मालिका संपता संपेना

आता उसावर पायरीला किडीचे संकट…!; बळीराजा वरील संकटांची मालिका संपता संपेना

अमरापूर । प्रशांत बाफना

आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. खतांच्या वाढलेल्या किंमती, उत्पादन खर्चात झालेली मोठी वाढ, पावसाने दिलेला ताण आणि त्यामुळे दर एकरी उत्पादनात झालेली घट, त्यातच वेळेवर पाटपाणी उपलब्ध न होणे या संकटांनंतर आता उसावर पायरीला (पाकोळी) किडीचा प्रादुर्भाव झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

शेतीसाठी लागणाऱ्या खत, औषधे, मजुरी, मशागत आणि सिंचनाच्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे यंदा पावसाने अनेक भागांत ताण दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून दर एकरी उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिकाला गरजेच्या वेळी पाटपाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.या सर्व संकटांमध्ये आता उसावर पायरीला (पाकोळी) या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या किडीची पिल्ले व प्रौढ उसाच्या पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी व निस्तेज पडतात. किडीने सोडलेल्या चिकट पदार्थावर काळी बुरशी वाढून पानांवर काजळी जमा होते. परिणामी प्रकाशसंलेषणाची प्रक्रिया मंदावून उसाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.आधीच वाढता खर्च, कमी उत्पादन आणि पाण्याचे संकट; त्यात किडीचे नवे संकट आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने कृषी विभागाकडून मार्गदर्शन आणि प्रभावी उपाययोजनांची गरज आहे
Previous Post Next Post