कुंभार समाजाच्या विकासाला नवी दिशा ; गुणवंत विद्यार्थी व समाजभूषणांचा यावल शहरात गौरव सोहळा.
आमदार अमोलदादा जावळे नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.३०
समाजाच्या प्रगतीचा मार्ग शिक्षण,सामाजिक एकोपा आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्यातून अधिक व्यापक होत असतो. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करतानाच समाजासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे ही समाजाच्या सुदृढ भविष्यासाठी आवश्यक बाब आहे.याच भावनेतून यावल-रावेर परिसरातील कुंभार समाजाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव,समाजभूषण पुरस्कार तसेच सामाजिक, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजबांधवांच्या सन्मानाचा भव्य सोहळा आमदार अमोल दादा जावळे, यावल नगरपरिषद अध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल दादा जावळे होते,तर प्रमुख पाहुण्या म्हणून यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील उपस्थित होत्या.
संत गोरोबा काका महामंडळासाठी प्रयत्न करणार ..
आमदार अमोल जावळे
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार अमोल दादा जावळे यांनी कुंभार समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांबाबत सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका मांडली. कुंभार समाजाचे आराध्य संत गोरोबा काका यांच्या नावाने ‘संत गोरोबा काका महामंडळ’ स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
समाजातील विद्यार्थी व युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, आधुनिक आणि विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करावी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या आणि गरजू घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार जावळे यांच्या या भूमिकेमुळे कुंभार समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक विकासाच्या अपेक्षांना नवी दिशा मिळेल, अशी भावना उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली.
विवरे व यावल येथील सभागृहांसाठी निधी; समाजबांधवांकडून आभार
यावेळी कुंभार समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी सभागृह उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अमोल दादा जावळे यांचे समाजबांधवांनी विशेष आभार मानले.
विवरे येथे समाजाच्या सभागृहासाठी २० लाख रुपये, तर यावल येथे सभागृहासाठी १७ लाख रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल समाजबांधवांनी आमदार जावळे यांचे अभिनंदन केले. स्वतंत्र सभागृहाची सुविधा उपलब्ध झाल्यास समाजाच्या बैठका, शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांना मोठे बळ मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा — सौ. छायाताई अतुल पाटील
प्रमुख पाहुण्या तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
“कुंभार समाज हा कष्टाळू, मेहनती आणि स्वाभिमानी समाज म्हणून ओळखला जातो. आई-वडिलांनी आयुष्यभर केलेले कष्ट, त्यांचा संघर्ष आणि मुलांच्या भविष्यासाठी घेतलेली मेहनत विद्यार्थ्यांनी सदैव डोळ्यासमोर ठेवावी. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण हे पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अनावश्यक वापरापासून दूर राहावे तसेच आपल्या आई-वडिलांचे, कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले.
समाजभूषण पुरस्काराने कर्तृत्ववानांचा सन्मान
कार्यक्रमात शिक्षण, समाजकारण, साहित्य आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजबांधवांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
श्री. रामभाऊ यादव पुन्नासे, श्री. अनंत तुकाराम कुंभार, श्री. भगवान रामदास कुंभार, श्री. गोकुळ रामदास कुंभार, श्री. वसंतराव पुंडलिक गाडेकर (कुंभार), श्री. सिताराम भगवान प्रजापती आणि श्री. भीमराव जालम पंडित यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तसेच श्री. निंबा पुंडलिक कुंभार यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल ‘साहित्यिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कै. ब. ना. गुरुजी यांना मरणोत्तर ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे भावी पिढीला प्रेरणा
या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पाठीवर समाजाकडून पडलेली कौतुकाची थाप ही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरते. एका गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान हा केवळ त्या विद्यार्थ्याचा गौरव नसून इतर विद्यार्थ्यांसाठीही यशाचा आदर्श निर्माण करणारा असतो.
कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान झाल्याने त्यांच्या योगदानाची समाजाकडून दखल घेतली जाते आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते. शिक्षण, सामाजिक एकोपा, संघटनात्मक बळ आणि युवकांचा सक्रिय सहभाग यांच्या माध्यमातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
आयोजकांचा उल्लेखनीय पुढाकार
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन श्री. घनश्याम प्रभाकर हरणकार, विभागीय युवक अध्यक्ष, कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र, विवरे खुर्द; श्री. संतोष सिताराम कापडे, यावल तालुका अध्यक्ष, फैजपूर; श्री. रवींद्र भादु प्रजापती, रावेर तालुका अध्यक्ष, ऐनपूर; श्री. विजय देविदास पंडित, जिल्हा युवक उपाध्यक्ष, यावल; श्री. रवींद्र मोहन मोरे, जिल्हा युवक सचिव, गोरगावले; श्री. सतीश लीलाधर कापडे, जिल्हा युवक सदस्य, न्हावी; तसेच श्री. संजय गंभीर हरणकार, रावेर तालुका उपाध्यक्ष यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
कार्यक्रमास कुंभार समाजातील पदाधिकारी, युवक, विद्यार्थी, पालक, गुणवंत विद्यार्थी, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक संस्कृती, सामाजिक एकोपा आणि शैक्षणिक प्रेरणेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या सोहळ्यामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले.
“गुणवंतांचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव आणि समाजविकासाचा निर्धार” या त्रिसूत्रीचा प्रभावी संदेश देणारा कुंभार समाजाचा हा सोहळा यावल-रावेर परिसरातील सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा देऊन गेला

