हिप्परगा थडीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायत हिप्परगा थडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असूनही अद्याप एकही हप्ता प्राप्त न झालेल्या लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच कागदपत्रांमधील त्रुटींची तपासणी करण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला.
या कॅम्पमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदी, कागदपत्रे आणि बँक खात्याशी संबंधित माहितीची तपासणी करण्यात आली. यावेळी काही लाभार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेट नसणे, बँक खात्याशी संबंधित त्रुटी तसेच केवायसी पूर्ण नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले.
लाभार्थ्यांच्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, आधार अपडेट, बँक खाते दुरुस्ती आणि केवायसी प्रक्रियेबाबत जेई बिराजदार इरफान तसेच पंचायत समिती ऑपरेटर राजू चव्हाण यांनी लाभार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. संबंधित त्रुटी दूर केल्यानंतर पुढील शासकीय प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, अनेक लाभार्थी घरकुलाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांच्या कागदपत्रांतील त्रुटी तातडीने दूर करून पुढील प्रक्रिया सुरळीत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी उडतेवार व येरणे तसेच सरपंच रहेरबेग इनामदार, ग्रामसेवक देवराव हंबीरे, ग्रामपंचायत सदस्य गौस शेख,पत्रकार राजेश आमेटवार,सेवक राजू अंजनिकर,अंगणवाडी सेविका शोभाताई धनुरे, प्रकाश अजगरे,बसलिंग अप्पा मठपती,गौरगोंडा तुकडे, गंगाराम एडकेवार, परसुरे मल्लू,एडकेवार अनिल यांच्यासह गावातील नागरिक व प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

