कलेक्टर, एसपींच्या नाकावर टिच्चून डीजे दणाणला, लेझर झगमगला!
नगरकर म्हणाले, कोण सुप्रिम कोर्ट? इथे आमचा स्वत:चाच कायदा आणि स्वत:चेच कोर्ट!
(सारिपाट / प्रशांत बाफना महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बी, लेझर लाईट्स या साऱ्यावर बंदीचे आदेश दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी काढले. त्याची कडक अंमलबजावणी होणार आणि आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई होणार असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सदुर्शन यांनी दिला. प्रत्यक्षात नगरकरांनी या दोघांच्याही नाकावर टिच्चून डीजेसह लेझर लाईट्सचा झगमगाट केला. सुप्रिम कोर्ट म्हणते, रात्री 10 नंतर डीजे बंद, आवाज 55 डेसिबलपेक्षा कमी, लेझरवर पूर्ण बंदी! कलेक्टर, एसपींचे सोडा हो! नगरकरांचा स्वत:चा असा कायदा आणि स्वत:चेच कोर्ट! त्यांनी रात्री उशिरा पोलिस बंदोबस्तात 120 नव्हे तर 240 पेक्षा जास्त डेसीबल्सने डीजे वाजवला. लेझर लाईटस सोडल्या! बाप्पाला नगरकरांनी निरोप दिला, पण तो बाप्पा कानात कापूस घालून गेला!
कलेक्टर आणि एसपी साहेब, आहे का तुमच्यात हिम्मत?
साहेब, तुमचा आदेश कागदावर नको! प्रत्यक्षात दिसू द्या! जर खरंच बंदी आदेश काढला होता ना! मग, कालच्या मिरवणुकीचे व्हिडिओ आहेत तुमच्या यंत्रणेकडे! त्या डीजे मालकांवर, गणपती मंडळांवर गुन्हे दाखल करा! दाखवा हिंमत! आता नगरकरांचे लक्ष तुमच्या कृतीकडे लागले आहे. सण हा शांततेचा असतो, दणदणाटाचा नाही हा संदेश आता द्यावाच लागणार आहे.
आदेश धुडकावला कोणी आणि कारवाई होणार का?
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला खरा, पण अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काय केले? पोलिसांनी भिंगारची घटना लक्षात घेऊन जास्त कडक भूमिका घेण्याचे सोडून दिल्याचेच दिसून आले. मंडळांचे डीजे ताब्यात घेऊन हुज्जत घालण्यापेक्षा वाद होणार नाही याची काळजीच त्यांनी घेतली. त्यातून कानठळ्या बसवणारे डीजे वाजले? आता, कारवाई कोणावर होणार? ज्यांनी दुर्लक्ष केले त्या अधिकाऱ्यांवर? गपणती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर की डीजे मालकांवर?
लेझर अन् डीजेचे पैसे कोणाचे?
मिरवणुकीतील लेझर नगरसह पुणे-नाशिकवरून आणले गेले. त्यांनी एका रात्रीचे 50 हजारांपेक्षा जास्त भाडे घेतले! डीजे वाल्यांचेही तेच! कानठळ्या बसवणारा त्यांना आवाज! ते देखील लाख-दोन लाख भाडे घेतात! हे भाडे कोण देतं? तर वर्गणीतून! सामान्य भाविकांच्या खिशातून! आणि त्याचा त्रास कोणाला? सामान्य माणसालाच!
कारवाई झाली की दुसऱ्या दिवशी मोर्चा!
पोलीस अन् महसूल प्रशासनाने कडक भूमिका घेतली की लागलीच, ‘हिंदू सणावर बंदी आणली’, असा डांगोरा पिटवला जातो! पण, सणावर बंदी कोणी आणली नाही! कानावर बंदी आणली आहे हे समजून घेण्याची गरज आहे. डीजे मुळे हार्ट अटॅक येतोय, लेझरमुळे डोळे जातात, हे कोण समजून घेणार?
नगरमध्ये सगळं सुरू होतं अन् तेही पोलीस बंदोबस्तात!
बाप्पाला निरोप देताना त्याचेच कान फाटले असणार! मिरवणुकीत डीजे ला बंदी! लेझर लाईटला बंदी! 100 डेसिबलच्या वर आवाज नाही! नियम मोडला तर गुन्हा दाखल होणार! आदेश निघाला, पेपरात बातमी आली, व्हॉट्सॲपला मेसेज फिरला! पण प्रत्यक्षात काय झालं? कापड बाजार, चितळे रोड, माणिक चौकसह जिकडे बघावं तिकडे प्रचंड आवाजाचे डीजे! कानठळ्या बसवणारा आवाज! लहान पोरं रडत होती, म्हातारी माणसं छाती धरून बसली होती! आणि लेझर लाईटचा तर कहर! आकाशात हिरवे, लाल लेझर! डोळ्यांना प्रचंड त्रास अन् धोका! सुप्रीम कोर्टाने बंदी घातली, तरी आमच्या नगरमध्ये सगळं सुरू होतं अन् तेही पोलीस बंदोबस्तात!
पोलीस कारवाईचा फक्त देखावा करणार!
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी डीजे चालक, लेझर लाईट्स वाले आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या प्रश्नाचे उत्तर, ‘नाही! कधीच नाही’, असेच आहे. कारण आमच्या नगरची पद्धतच तशी आहे! गणपतीच्या आधी – कडक आदेश! गणपतीच्या मिरवणुकीत – सगळं धुडकावलं! आणि गणपतीच्या नंतर – पुढच्या वर्षी बघू! गेल्या पाच वर्षांत नगरमध्ये डीजे आणि लेझरवर किती गुन्हे दाखल झाले? बोटावर मोजण्याइतके! आणि त्यातही अटक अथवा शिक्षा किती जणांना झाली! त्याचे उत्तर भले मोठे शून्य असेच येते! मग, हा कागदी खेळ खेळलाच का जातो हा खरा प्रश्न आहे

