*'ऑपरेशन नारकोस' अंतर्गत आरपीएफचा सर्जिकल स्ट्राइक! ४ लाख ५९ हजारांच्या गांजासह झारखंडच्या तरुणाला बेड्या*
(*अकोला जिल्हा विभागीय संपादक इमरान खान*)
अकोला: मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतर्गत येणाऱ्या अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि सीआईबी अकोला यांनी संयुक्त कारवाई करत 'ऑपरेशन नारकोस'अंतर्गत अवैध गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शालीमार एक्सप्रेसमधून आलेल्या एका १८ वर्षीय संशयित तरुणाकडून ४ लाख ५९ हजार ९०० रुपये किमतीचा ९.१९८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.गुप्त माहितीच्या आधारे कारवाई२४ सप्टेंबर २०२६ च्या रात्री ९:३१ वाजताच्या सुमारास ट्रेन क्र. १८०३० शालीमार एक्सप्रेस अकोला स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ०१ वर आली. आरपीएफ अकोलाचे निरीक्षक लक्ष्मण यादव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, उपनिरीक्षक प्रशांत गवई, दीपक टिंगरे, सुनील कोली (सीआईबी), मंगेश सदानशिव, पंकज गवई, भागवत सरकटे तसेच एमएसएफ कर्मचारी गजानन राठोड आणि विकास उमाले यांच्या पथकाने गाडीची तपासणी सुरू केली.गाडीतून उतरून एक तरुण घाईघाईने स्थानकाबाहेर पळण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्याला टीसी कार्यालयाजवळील खांब क्रमांक ५८३/३७ जवळ अडवले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव मोहम्मद सज्जाद मोहम्मद जब्बार अंसारी वय १८ वर्ष, रा. पीपरधिनी, चंद्रपुरा, जि. बोकारो, झारखंड असे सांगितले.संशयिताजवळील 'AJS Tourister' नावाच्या काळ्या रंगाच्या बॅगची तपासणी केली असता, त्यात खाकी सेलो टेपने लपेटलेले ७ पाकिटे आढळली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक सुरक्षा आयुक्त, एडीइएन अकोला डी. के. रवी, अधिकृत वजन काटा धारक अमन कुरेशी, छायाचित्रकार आणि सरकारी पंचांच्या उपस्थितीत प्लॅटफॉर्मवर CCTV निगराणीखाली बॅग उघडण्यात आली. पाकिटांमध्ये हिरव्या रंगाचा, फुले व बिया असलेला गांजा आढळून आला. वजन केले असता एकूण ९.१९८ किलोग्राम गांजा भरला, ज्याची बाजारपेठेत अंदाजे किंमत ४,५९,९०० रुपये आहे. सर्व मुद्देमाल विधिवत जप्त करून कारवाईचे चित्रीकरण करण्यात आले.वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी मोहम्मद सज्जाद याला जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी अकोला जीआरपीच्या स्वाधीन करण्यात आले. जीआरपी अकोला यांनी आरोपीविरोधात अपराध क्रमांक ३२०/२०२६, कलम २०(b)(ii)(B) NDPS ॲक्ट १९८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय प्रदीप डोलारे करत आहेत.वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ व सीआयबी अकोला टीमने केलेल्या या सतर्क कारवाईमुळे रेल्वेमार्गे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा तडाखा बसला आहे.

