बहुपत्नीत्वाचे वास्तव "
(प्रशांत बाफना विभागीय संपादक 8055440385)
भारतीय मुस्लिम महिला आंदोलन " या संघटनेने केलेल्या " Breaking the Silence-Lived Reality of 2500 Indian Muslim Women in Polygamous Marriages 'या अभ्यासातून भारतीय मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्वाच्या वास्तवाकडे गंभीरपणे लक्ष वेधले आहे असे लेखात नमूद करून तद्अनुषंगाने तपशीलात माहिती विशद करणार्या या विचाप्रवर्तक लेखाचा सुसूत्र सविस्तर गोषवारा असा:—
मुस्लिम महिलांना स्वतःच्या वैवाहिक अधिकारांविषयी असलेली माहिती हा सर्वांत महत्वाचा मुद्दा या सर्वेक्षणाचा होता. या सर्वेक्षणांत एकूण २,५०८ भारतीय मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या.त्यामध्ये १,४१९ पहिल्या पत्नी आणि १,०८९ दुसर्या पत्नींचा सहभाग होता.
या सर्वेक्षणात निकाहनामासारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजाचे नियंत्रणही अनेक महिल्यांच्या हातात नव्हते.तब्बल २,०७९ महिलांनी( सुमारे ८३ टक्के) आपला निकाहनामा कधीच वाचला नव्हता.त्यात
१,१८६ पहिल्या पत्नी आणि ८९३ दुसर्या पत्नींचा समावेश होता.३८ टक्के महिलांना त्यांचा निकाहनामा कुठे आहे, हेही माहिती नव्हते,तर केवळ २७ टक्के महिलांकडे हा दस्तऐवज त्यांच्या स्वतःच्या ताब्यात होता. दुसर्या विवाहाच्या प्रक्रियेतही गुप्तता आणि दिशाभूल झाल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले.जवळपास ३२ टक्के दुसर्या पत्नींना पतीच्या आधीच्या विवाहाबाबत माहिती नव्हती किंवा त्यांची दिशाभूल करण्यात आली होती.पहिल्या पत्नींपैकी तब्बल ८५ टक्के महिलांना पतीच्या दुसर्या विवाहाची माहिती थेट पतीकडून मिळाली नव्हती.दुसर्या पत्नीपैकी ३९.६ टक्के महिलांनी प्रेमसंबंधामुळे विवाह स्वीकारल्याचे सांगितले,तर ३९.४ टक्के महिलांनी कौटुंबिक दबावामुळे विवाह केला.११.४ टक्के महिलांनी पुरूषाने विवाहासाठी जबरदस्ती केल्याचे सांगितले.धर्मात चार पत्नी ठेवण्याचा अधिकार असल्याचे सांगत पुरूषांनी, दुसरा विवाह केलेल्या ३९.७ टके महिला आढळून आल्या.१२.८ टक्के महिलांना तर पुरूषांने स्वतःचा घटस्फोट झाला असे खोटे सांगितले होते.
दुसर्या विवाहाचा परिणाम पहिल्या पत्नींच्या संपूर्ण आयुष्यावर होतो.४७ टक्के महिला माहेरी राहायला गेल्या.५४ टक्के महिलांनी पती आता त्यांच्यासोबत राहत नसल्याचे सांगितले. याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही झाल्याचे आकडेवारी दर्शविते. सर्वांत गंभीर बाब म्हणजे ८.४ टक्के पहिल्या पत्नींनी आत्महत्येचे विचार अनुभवल्याचे सांगितले.शाह बनो प्रकरणात केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधी कायदा केला तेव्हा त्या कायद्याला काँग्रेसने का विरोध केला ? तसेच आज राहुल गांधी पितृसत्ताक विचारसरणी मोडून काढण्याची भाषा करत असताना ' Smash the Patriarchy 'मध्ये या मुस्लिम महिलांचा समावेश का नाही? असा प्रश्र्न मुस्लिम महिलांनी उपस्थित केला आहे.
या संघर्षाची किंमत पुढील पिढीलाही मोजावी लागते,पहिल्या पत्नीच्या मुलांमध्ये दुःख ही सर्वात सामान्य प्रतिक्रिया होती.बहुपत्नीत्वाचा प्रश्र्न केवळ दोन पत्नी आणि एका पतीच्या नात्यापुरता मर्यादित राहत नाही.घरातील विश्वास तुटतो, सुरक्षिततेची भावना कमी झाली आणि आर्थिक व भावनिक आधार डळमळीत झाला,की त्याचे परिणाम स्रीच्या मनावर,शरीरावर आणि मुलांच्या भावविश्वावर उमटतात. एकंदरीतच या सर्वैक्षणातील महिलांच्या अनुभवांतून
आर्थिक अवलंबित्व,
शिक्षणाचा अभाव, वैवाहिक नात्यातील गुप्तता,महत्त्वाच्या दस्तऐवजांवरील नियंत्रणाचा अभाव आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी यांच्या गुंतागुंतीचे चित्र समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय मुस्लिम समाजातील प्रबोधनाचा मुद्दा आपल्या राजकीय आणि सामाजिक अजेंड्यावर केव्हा येणार असा प्रश्र्न उपस्थित होतो.हिंदू समाजातील स्रियांची परिस्थिती आज पूर्णतः आदर्श आहे,असा दावा करता येणार नाही.स्रियांवरील अन्याय आजही आहे. पण गेल्या दोन शतकांतील सामाजिक सुधारणा चळवळींनी प्रबोधनातून स्रीच्या अधिकारांविषयी वैचारिक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे आज अनेक स्रियांमध्ये अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची आणि गरज पडल्यास न्यायालयाची पायरी चढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. हमीद दलवाई मुस्लिम समाजात सुधारक विचारवंत झाले.पण मुस्लिम समाजातील प्रबोधनाला व्यापक सामाजिक चळवळीचे स्वरूप देण्यात त्यांचे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत.इतर समाजातील सुधारकांना राष्ट्रीय स्तरावर सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक म्हणून स्वीकारण्यात आले;त्याच पद्धतीने मुस्लिम समाजातील सुधारक विचारवंतांना मुख्य प्रवाहात स्थान मिळाले का? हा प्रश्र्न आजही अनुत्तरीत आहे.
राजकीय पक्षांची भूमिकाही येथे तपासावी लागेल .
काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ अल्पसंख्याकांच्या हिताच्या रक्षणाचे राजकारण केले. अल्पसंख्यांच्या हिताचे रक्षण म्हणजे केवळ धार्मिक नेतृत्वाच्या राजकीय अपेक्षा पूर्ण करणे नव्हे.तर त्या समाजाला आधुनिक, प्रगतिशील आणि सामाजिक सुधारणांच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी होती.त्या समाजातील महिलांना शिक्षण,स्वातंत्र्य आणि समान अधिकार मिळावेत,यासाठी राजकीय व सामाजिक नेतृत्वानेही प्रयत्न करणे अपेक्षित होते. सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य मुख्यतः शिक्षणातून येते.त्यामुळे मुस्लिम समाजातील आधुनिक शिक्षणाचा प्रश्र्न हा केवळ शिक्षण नाही;तो महिला स्वातंत्र्याचा प्रश्र्न आहे.मुस्लिम महिलांना त्यांच्या वैवाहिक आणि कायदेशीर अधिकारांची माहिती मिळणे,आधुनिक शिक्षणाच्या संधी वाढणे आणि सामाजिक सुधारणांबाबत खुली चर्चा होते अत्यावश्यक आहे.या सर्वेक्षणातील सर्व आकडेवारीतील प्रत्येक आकड्यामागे एका स्रीचे आयुष्य आहे;अनेकदा तिच्या मुलांचेही भविष्य आहे. त्यामुळे प्रश्र्न केवळ बहुपत्नीत्वाचा नाही. प्रश्र्न आहे मुस्लिम समाजातील प्रबोधनाचा.आणि हा प्रश्र्न जितका मुस्लिम समाजाचा आहे, तितकाच स्वतःला प्रगतिशील,धर्मनिरपेक्ष आणि स्रीवादी म्हणवणार्या भारतीय राजकारणाचाही आहे

