दिग्गजांच्या पळापळीने राजकीय समीकरणे बदलली; कुणी विखेंच्या तर कुणी शिंदेंच्या सोबतीला!..श्रीगोंद्यात दिग्गज नेत्यांच्या बदलत्या जवळकीने राजकीय चर्चांना उधाण..

दिग्गजांच्या पळापळीने राजकीय समीकरणे बदलली; कुणी विखेंच्या तर कुणी शिंदेंच्या सोबतीला!..

श्रीगोंद्यात दिग्गज नेत्यांच्या बदलत्या जवळकीने राजकीय चर्चांना उधाण..


प्रशांत बाफना । अहिल्यानगर


श्रीगोंदा ः तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीची चर्चा सुरू असतानाच पक्षातील काही दिग्गज नेत्यांच्या बदलत्या राजकीय जवळकीने आगामी जिल्हा सहकारी बँक आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या जवळ जाताना दिसत आहे, तर कुणी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात राष्ट्रवादीची एकजूट नेमकी कुठे आहे, हा सवाल आता राजकीय वर्तुळात रंगू लागला आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला होता. माजी आमदार राहुल जगताप, श्रीगोंदा साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासह अनेक नेत्यांनी एकाच दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, कालांतराने बदललेली राजकीय परिस्थिती आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे हेच समीकरण आता वेगळ्या वळणावर येताना दिसत आहे.

स्नेहभोजनापेक्षा गैरहजेरीचीच चर्चा
श्रीगोंदा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच राजेंद्र नागवडे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. बारामतीकडे जात असताना त्यांनी नागवडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्याची चर्चा आहे. मात्र या भेटीपेक्षा राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांची गैरहजेरी अधिक चर्चेचा विषय ठरली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भगवानराव पाचपुते यांच्यासह काही प्रमुख नेते या कार्यक्रमापासून दूर राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे श्रीगोंदा राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीकरणांची परीक्षा
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे हे आपापल्या पातळीवर निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकाच पक्षात असलेल्या या नेत्यांची पुढील राजकीय वाटचाल आणि त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे राजेंद्र नागवडे यांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाशी जवळीक वाढत असल्याची राजकीय चर्चा आहे. दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप हे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे नागवडे-विखे पाटील समीकरणाची चर्चा, तर दुसरीकडे राहुल जगताप-राम शिंदे यांची जवळीक या दोन्ही घडामोडींमुळे श्रीगोंद्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



राष्ट्रवादीची एकजूट नेमकी कुठे?
आगामी जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद निवडणुका या स्थानिक नेत्यांसाठी राजकीय शक्तिपरीक्षेच्या ठरणार आहेत. पक्षाच्या झेंड्याखाली नेते एकत्र दिसत असले तरी स्थानिक पातळीवर प्रत्येकाची राजकीय गणिते वेगळी असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची श्रीगोंद्यातील संघटनात्मक ताकद किती टिकून आहे आणि पक्षातील दिग्गज नेते आगामी निवडणुकांमध्ये एकदिलाने मैदानात उतरतात की स्वतंत्र राजकीय वाटा निवडतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. एक पक्ष, अनेक नेते आणि वेगवेगळ्या राजकीय वाटा असे चित्र निर्माण झाले, तर त्याचा नेमका फायदा कोणाला आणि फटका कोणाला? याचे उत्तर आगामी जिल्हा बँक व जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालातूनच मिळणार आहे. तोपर्यंत मात्र श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीची एकजूट आणि दिग्गजांची पळापळ हा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहणार, हे निश्चित
Previous Post Next Post