ताजनापूर लिफ्टमध्ये बालमटाकळी गावचा समावेश करण्याची मागणी.

ताजनापूर लिफ्टमध्ये बालमटाकळी गावचा समावेश करण्याची मागणी. 

अहिल्यानगर/प्रशांत बाफना - 

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी गावाचा ताजनापूर टप्पा क्र. ३ या योजनेमध्ये तातडीने समावेश करण्यात यावा, अशी लेखी मागणी भाजपचे नेते कासमभाई शेख तसेच माजी सरपंच अशोकराव खिळे यांनी केली आहे. या बाबत त्यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांना लेखी निवेदन देऊन बालमटाकळी व परिसरातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. बालमटाकळी गावात पाण्याचा कोणताही ठोस व कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध नसल्याने गाव पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून अनेक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाऊस लांबल्यामुळे परिसरातील तलाव, बंधारे व जलसाठ्यांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे ताजनापूर टप्पा क्र. ३ मध्ये बालमटाकळी तसेच परिसरातील पाणीटंचाईग्रस्त गावांचा तातडीने समावेश करून बंदिस्त पाईपलाईनद्वारे गाव परिसरातील तलाव, बंधारे व इतर जलसाठे भरून देण्यात यावेत, या माध्यमातून जलसाठे निर्माण झाल्यास शेतीसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार असून त्यासाठी बालमटाकळी व परिसरातील गावांसाठी कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे कासमभाई शेख व अशोकराव खिळे यांनी निवेदनात म्हटले आहे
Previous Post Next Post