श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर. संस्था स्तरावर सोलजर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन पुणे तर व्यक्ती स्तरावर पद्मश्री डॉ. श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांची निवड...

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर.
 संस्था स्तरावर सोलजर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन पुणे तर व्यक्ती स्तरावर पद्मश्री डॉ. श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांची निवड...

नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक
प्रा. डी. सी. पाटील

शहादा : येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी संस्था स्तरावर सोलजर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन पुणे तर व्यक्ती स्तरावर माळसोन्ना जि. परभणी येथील कापूसतज्ञ पद्मश्री डॉ. श्रीरंग देवबा लाड(दादा लाड) यांना पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील व सचिव प्रा. मकरंद पाटील यांनी दिली आहे.
       शहादा येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती व संस्थेला पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप रु.१ लाख व मानचिन्ह या स्वरुपाचे असते.
       सन २००३ पासून आतापर्यंत हा पुरस्कार व्यक्ती स्तरावर मा. प्रा. डॉ. राम ताकवले (माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली, मा. डॉ.यु. म. पठाण (संत साहित्याचे गाढे अभ्यासक), मा. डॉ. विजय भटकर (परम हा संगणकाचे प्रमुख वैज्ञानिक), मा. डॉ. वसंत गोवारीकर (माजी संचालक, इस्रो, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ), मा.प्रा. सुखदेव थोरात (माजी चेअरमन, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली. मा. डॉ. नागनाथ कोतापल्ले (माजी कुलगुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद) मा. डॉ. जयंत नारळीकर (जेष्ठ गणितज्ज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ, पुणे) डॉ. दिपक जयंतराव टिळक (कुलगुरु, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे) डॉ. बी. के. गोयल (बॉम्बे हॉस्पीटल, बॉम्बे), डॉ. नरेंद्र जाधव (सदस्य, नियोजन आयोग नवी दिल्ली), डॉ. सदानंद श्रीधर मोरे (प्राध्यापक तत्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे) मा. सौ. सिंधुताई सपकाळ (माई अध्यक्षा, सन्मती बाल निकेतन संस्था), डॉ. शरद पी. काळे (भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील न्युक्लीअर अॅग्रीकल्चर व बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख), मा. श्री. पोपटराव पवार (सरपंच हिवरे बाजार अहमदनगर, माजी विधानपरिषद सदस्य) जेष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर, श्री. ज्ञानदेव गंगाराम हापसे उर्फ डॉ. डी. जी. हापसे (उस तज्ज्ञ), मा. श्री. सतीश मराठे (संचालक रिझर्व बँक ऑफ इंडिया), मा. श्री. पानिपतकार विश्वास पाटील (जेष्ठ साहित्यीक मुंबई), श्रीमती राहीवाई सोमा पोपेरे (कोंभाळणे ता. अकोले जि. अहमदनगर) जादुगार जितेंद्र रघुवीर भोपळे, पुणे, चैत्राम देवचंद पवार (बारीपाडा), श्रीमती भारतबाई देवकर (तुळजापूर), पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना देण्यात आला आहे. 
     तर संस्था स्तरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, महात्मा ज्योतिबा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, श्री क्षेत्र चैतन्य अध्यात्मिक केंद्र. (दुधिवरे), मराठी साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक, विमानतळ भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान संस्था बहादरपुर जि. जळगाव, साधना ट्रस्ट पुणे, हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड कोल्हापूर, सेवाग्राम आश्रम वर्धा, डॉ. लाजपतराय मेहरा न्युरोथेरपी सुर्यमाळ जि. ठाणे, पालवी प्रतिष्ठान पंढरपूर, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ धुळे, मराठी विज्ञान परिषद मुंबई, श्रध्दा रिहॅबीलीटेशन फाउंडेशन-वेणगाव कर्जत जि. रायगड नाम फाउंडेशन पुणे, टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव जि. बुलढाणा, केशवस्मृती प्रतिष्ठान जळगाव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत पुणे, तर्पण फाऊंडेशन, आपकी जय परिवार मोरवड यांना दिलेला आहे.
        यावर्षी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी संस्था स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार सोलजर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन पुणे या संस्थेस देण्यात येणार आहे. ही पुण्यातील एक प्रतिष्ठीत सामाजिक संस्था असून निवृत्त विंग कमांडर योगेश चिथडे आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सुमेधा चिथडे यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था भारतीय सैन्यदल आणि निमसरकारी दलातील वीर जवान, शहीद सैनिकांची कुटूंबे आणि दिव्यांग जवानांच्या पुर्नवसन आणि कल्याणासाठी समर्पित आहे. सैनिकांचे देश सेवेतील योगदान आणि बलिदान लक्षात घेऊन जवान व त्यांच्या कुटूंबियांना सामाजिक आणि आर्थिक पाठबळ देणे हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे. सीयाचीन भागातील सैनिकांसाठी ऑक्सीजन जनरेशन प्लांट उभारणे, शहीद परिवारांचे पुर्नवसन, दिव्यांग जवानांना मदत, शहीद सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य तसेच माझा सैनिक माझे कर्तव्य अभियान आदि उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात. ही संस्था पूर्णपणे नागरिकांच्या स्वेच्छादान आणि लोकसहभागातून चालते. प्रत्यक्ष सीमेवर जाऊन सैनिकांच्या गरजा पूर्ण करणे हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. संस्थेच्या या अतुलनिय सामाजिक कार्याची दखल घेत पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
      यावर्षी व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार कापूसतज्ञ पद्मश्री डॉ. श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांना दिला जाणार आहे. माळसोन्ना जि. परभणी येथील डॉ. श्रीरंग लाड यांनी १९७०च्या दशकापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि पुढे भारतीय किसान संघाचे वरिष्ठ संघटक म्हणून शेतकरी हितार्थ कार्य केले आहे. कापसाचे एकरी उत्पादन दुपटीने वाढविणारे त्यांनी विकसीत केलेले स्वदेशी तंत्रज्ञान "दादा लाड" कापूस तंत्रज्ञान म्हणून प्रसिध्द आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्विकारले आहे. त्यांनी मराठवाड्यातील मूळ देशी गोवंश असलेल्या लाल कंधारी व देवनी गायींच्या प्रजातींचे जतन व संवर्धनासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनिय योगदान व कापूस उत्पादनात क्रांती घडवून आणल्याबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. लाड यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली असून इतरही अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
      अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. दीपकभाई पाटील व सचिव प्रा. मकरंद पाटील यांनी दिली आहे. सदर पुरस्कार प्रदान समारंभ शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
Previous Post Next Post