अहिल्यानगरमध्ये मातोश्री वृद्धाश्रमात रक्तरंजित थरार; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी..आरोपी पोलिसांच्या ताब्यात..

अहिल्यानगरमध्ये मातोश्री वृद्धाश्रमात रक्तरंजित थरार; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी..

आरोपी पोलिसांच्या ताब्यात..

(अहिल्यानगर / प्रशांत बाफना महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)


अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील मातोश्री वृद्धाश्रमात शनिवारी पहाटे सुमारे सहा वाजता रक्तरंजित हल्ल्‌‍याची घटना घडली. वृद्धाश्रमातील राजू घुले (रा. कुंभारी गावठाण, कोपरगाव) याने तेथील सुरक्षारक्षकासह इतर वृद्धांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत सुरक्षारक्षक आणि एका वृद्धाचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मृतांमध्ये महाकालेश्वर बाबासाहेब हेणे (वय 54) आणि दत्तात्रेय शंकर हारके (वय 80) यांचा समावेश आहे. तर गणेश छबू घोडके (वय 60), बाळासाहेब अंबादास घाडगे (वय 78), गोरख हरिभाऊ फुंदे (वय 74), साहेबराव दगडू भवर (वय 58), लिंबराज दामोदर फिस्के (वय 80) आणि संतोष भिमराज पिरंगळ (वय 60) हे जखमी झाले आहेत. यापैकी एका जखमीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास राजू घुले याने प्रथम वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकावर हल्ला केला. या हल्ल्‌‍यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. त्यानंतर घुले वृद्धाश्रमाच्या परिसरात गेला आणि आणखी एका व्यक्तीवर हल्ला केला. त्यातही संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर घुले याने वृद्धाश्रमातील इतर रहिवाशांवर हल्ला केला. या घटनेत सहा जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हल्ल्‌‍यानंतर काही वृद्धांनी वृद्धाश्रमाच्या समोरील पेट्रोलपंपावर जाऊन पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची सुरुवातीची माहिती मिळताना काही काळ संभ्रमाचे वातावरण होते. वृद्धाश्रमात दरोडा पडल्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र, वृद्धांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितल्यानंतर आणि वृद्धाश्रमातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर हल्ल्‌‍याचे चित्र स्पष्ट झाले. दरम्यान फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली.

घटनेची माहिती मिळताच वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विक्रम राठोड आणि संचालक छाजेड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली तसेच वृद्धाश्रमातील इतर रहिवाशांना धीर दिला. वृद्धाश्रमातील एकाने इतरांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात करत आहेत.



हल्ल्‌‍यामागचे कारण अद्याप स्पष्ट नाही
या हल्ल्‌‍यामागे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, घटनाक्रम आणि संबंधित व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. घटना नेमक्या कोणत्या कारणातून घडली, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक शिरीष वमणे यांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, वृद्धाश्रमातील सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांच्या तपासातून हल्ल्‌‍याचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

महिलांवर हल्ला नाही
मातोश्री वृद्धाश्रमात एकूण 30 जण होते. त्यामध्ये 17 पुरुष व 13 महिला होत्या. राजू घुले याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराने वृद्धाश्रमातील कोणत्याही महिलेवर हल्ला केला नाही
Previous Post Next Post