बोदवडमध्ये वीजतार चोरीचा गुन्हा उघड; तीन आरोपी अटकेत!
१ लाख ७६ हजारांची अॅल्युमिनियम तार चोरी; ३३ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, अन्य आरोपींचा शोध सुरू..
बोदवड, दि. 20 ऑक्टोबर | प्रतिनिधी
बोदवड तालुक्यातील कुन्हा पानाचे ते बोदवड रस्त्यावरील रानमळा हॉटेलजवळील फरशी डीपी क्रमांक ०२ तसेच शेतशिवारातील लघुदाब वीज वाहिनीच्या अॅल्युमिनियम तारा चोरीप्रकरणी बोदवड पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून ३३ हजार ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
१६ गाळ्यांतील ५,८५२ मीटर वीजतार चोरीला
दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान ही चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी लघुदाब वीज वाहिनीच्या ३४ चौरस मिलिमीटर क्षमतेच्या १६ गाळ्यांतील एकूण ५ हजार ८५२ मीटर अॅल्युमिनियम तार चोरून नेली होती. या तारांची किंमत १ लाख ७६ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
या प्रकरणी २४ सप्टेंबर २०२६ रोजी बोदवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) तसेच विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासातून तीन आरोपी निष्पन्न
गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन चोरीचा प्रकार उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन संशयितांना निष्पन्न करून अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१. समाधान अशोक कुंभार (वय ३५) — रा. विचवा, ता. बोदवड, जि. जळगाव.
२. अक्षय वसंत घयार (वय २७) — रा. मोढाळा, ता. भुसावळ.
३. नाकीर उस्मान खाटीक (वय ५८) — रा. जाम मोहल्ला, भुसावळ.
अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. या गुन्ह्यात अन्य आरोपी सहभागी आहेत का, याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष लव्हंगळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ महानवर यांच्या सूचनेनुसार तपास करण्यात आला.
या तपास पथकात बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश महाजन, अतुल कुमावत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख आणि प्रेमकुमार सपकाळे यांचा सहभाग होता.
वीजतार चोरीच्या या प्रकरणाचा पुढील तपास बोदवड पोलीस करीत असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

