शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची अडवणूक; चौघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल.
पूजेचे साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यासाठी दबाव; पोलिसांची कारवाई.
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
देशभरातून लाखो भाविक श्रद्धेने शनिदर्शनासाठी येत असलेल्या श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानातून पूजेचे साहित्य खरेदी करण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आला आहे. भाविकांची अडवणूक करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध स्वतंत्र चार गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खासगी चारचाकी वाहनांना अडवून त्यांना पुढे जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी दादासाहेब लक्ष्मण थोरात (वय ४२) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, राजेंद्र खंडू फुलमाळदार (वय ५०, रा. करजगाव, ता. नेवासा) यांच्याविरुद्धही भाविकांची वाहने अडवून पूजेचे साहित्य खरेदी करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारी सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास कुन्हाट पार्किंग परिसरातील रस्त्यावर भाविकांच्या वाहनांना अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारीवरून युवराज प्रकाश जाधव (वय ४०, रा. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, पार्किंग परिसरात भाविकांची वाहने अडवून त्यांना दुकानातून पूजेचे साहित्य खरेदी करण्याचा आग्रह केल्याच्या प्रकरणात सलीम बाबा सय्यद (वय ४८, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शनिशिंगणापूर येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा वेळी भाविकांच्या वाहनांची अडवणूक करून त्यांना विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी गंभीर मानल्या जात आहेत. या कारवाईमुळे भाविकांची होणारी गैरसोय आणि वाहतुकीतील अडथळ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

