तब्बल ४० वर्षांनंतर अहिल्यानगरमध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा थरार, राज्यातील ४८ संघांचा सहभाग
२८ नोव्हेंबरपासून ६२ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा; राज्यातील ४८ संघांचा सहभाग.
अहिल्यानगर / प्रशांत बाफना
तब्बल चार दशकांनंतर अहिल्यानगर शहराला पुन्हा एकदा पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य क्रीडा मंडळ, निर्मलनगर यांच्या वतीने ६२ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
सन १९८६ मध्ये सहकार क्रीडा मंडळ, अहमदनगर यांच्या वतीने पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे ४० वर्षांनी पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगरमध्ये होत आहे. या स्पर्धेत राज्यातील पुरुषांचे २४ आणि महिलांचे २४ असे एकूण ४८ संघ सहभागी होणार असून, सुमारे ७२० खेळाडूंसह प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, पंच, तांत्रिक समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र खो-खो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेसाठी चार स्वतंत्र मैदाने तयार करण्यात येणार असून, दिवसा आणि रात्री विद्युत रोषणाईत सामने खेळविण्यात येतील. प्रेक्षकांसाठी तीन ते चार हजार आसनक्षमतेची गॅलरी उभारण्यात येणार आहे. सहभागी खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून, चारही दिवस जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्पर्धेतील सामन्यांचे आकाशवाणी, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून देण्याकामी रामचंद्र दरे, विवेक भापकर, अॅड. विश्वासराव आठरे पाटील आणि जयंत वाघ यांनी सहकार्य केले आहे. पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, डॉ. सुजय विखे पाटील, नगरसेवक निखिल वारे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे आणि महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार संग्राम जगताप, डॉ. सुजय विखे पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष सी.ए. अशोक पितळे, सचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव आणि अहमदनगर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष अॅड. विश्वासराव आठरे पाटील उपस्थित राहणार आहेत. समारोप व पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
अहमदनगर जिल्हा खो-खो संघटनेची स्थापना १९७२ मध्ये कै. पी.के. रत्नपारखी, दिनुभाऊ कुलकर्णी, व्ही.ए. निवसरकर, एम.व्ही. बर्डे आणि बी.आर. मोरे यांनी केली. त्यानंतर डॉ. विलास कवळे, अशोक पितळे आणि निर्मलचंद्र थोरात यांनी संघटनेचे कामकाज पाहिले. सध्या अॅड. विश्वासराव आठरे पाटील, विकास परदेशी आणि गौरव पितळे हे संघटनेची जबाबदारी सांभाळत आहेत.
खो-खो क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याची गौरवशाली परंपरा असून, जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले आहेत. पुरुष गटातील एकलव्य पुरस्कार निर्मलचंद्र थोरात, कुमार गटातील वीर अभिमन्यू पुरस्कार आदित्य कुदळे व तेजस मगर, तर किशोर गटातील भरत पुरस्कार राहुल चव्हाण यांनी प्राप्त केला आहे. महिला गटात राणी लक्ष्मीबाई पुरस्कार श्वेता गवळी, कुमारी गटातील जानकी पुरस्कार नंदिनी देशमुख व श्वेता गवळी, तर किशोरी गटातील वीरबाला पुरस्कार श्वेता गवळी व मयुरी मुत्याल यांनी मिळविला आहे.
निर्मलचंद्र थोरात, श्वेता गवळी, मयुरी मुत्याल आणि निकिता मरकड यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. सुधीर चपळगावकर यांनी आंतरविद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठ संघाचे नेतृत्व केले आहे. पुरुष गटात अशोक पितळे, नंदकुमार पवार, निर्मल थोरात, श्रीकांत निंबाळकर, सुधीर चपळगावकर, विकास परदेशी आणि आदित्य कुदळे, तर महिला गटात विद्या जोगळेकर, नंदिनी कुलकर्णी, सुरेखा काबरा, मुक्ता गायकवाड, वंदना देशमुख, वैशाली बोतर्डीकर, कीर्ती गुंदेचा, अंजली लांडगे, नंदा शेलार, श्वेता गवळी, मयुरी मुत्याल आणि निकिता मरकड यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील खो-खो खेळाडूंनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. जिल्ह्यात हा पुरस्कार सर्वप्रथम निर्मलचंद्र थोरात यांना मिळाला, तर त्यानंतर श्वेता गवळी हिनेही हा बहुमान मिळविला. श्वेता गवळी हिने दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकाविले आहे. खो-खोच्या विविध वयोगटांत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची कामगिरीही तिने केली आहे.
नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खो-खो खेळ लोकप्रिय असून ग्रामीण भागातील खेळाडूही राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. यापूर्वी १९८२ मध्ये प्रवरानगर येथे ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि राजेंद्र विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फेडरेशन कप आणि सब-ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
चार दशकांनंतर अहिल्यानगरमध्ये होत असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना राज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. मैदानी खेळांमुळे शरीर स्वास्थ्य सुदृढ राहत असल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त मैदानी खेळांकडे प्रोत्साहित करावे, यशस्वी क्रीडापटूंना शासन स्तरावर अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
यावेळी ॲड विश्वासराव आठरे, प्रा सुनील जाधव, सुमतीलाल कोठारी, गौरव पितळे यांसह खेळाडू उपस्थित होते. यावेळी स्पर्धेच्या बोधचिन्हाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

