शेवगावात रखडलेला रस्ता अन् अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त!
१८ नोव्हेंबर रोजी आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा.
अहिल्यानगर (प्रशांत बाफना) :
शहरातून जाणाऱ्या तिसगाव–पैठण मार्गावरील रखडलेले रस्त्याचे काम आणि अपूर्ण दुहेरीकरणामुळे नागरिकांसह व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. गाडगेबाबा चौक ते क्रांती चौक या दरम्यानच्या रस्त्याचे काम बंद असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आंबेडकर चौकात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद अवस्थेत आहे. अर्धवट रस्त्यावरून वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, परिसरातील नागरिक, व्यापारी आणि पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः विश्व हिंदू परिषद कार्यालय ते गाडगेबाबा चौकादरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
रस्त्याच्या अरुंदपणामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, दुचाकीस्वारांसह इतर वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर हर्षदा काकडे, अमर पुरनाळे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी शेवगाव तहसील कार्यालयात निवेदन सादर केले आहे. रखडलेल्या तिसगाव–पैठण रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर मा जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, वंचित चे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, हरीष भारदे, आशुतोष डहाळे, अमर पुरनाळे, सुनील काकडे, प्रवीण भास्कर, जाकीर कुरेशी, कैलास तुजारे यांच्यासह स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा १८ नोव्हेंबर रोजी आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला

