मोहरीत बिबट्या जेरबंद; केळवंडीत बैलाचा बळी.बिबट्या की पट्टेरी वाघ? शेतकरी आणि वन कर्मचाऱ्यांत वाद

मोहरीत बिबट्या जेरबंद; केळवंडीत बैलाचा बळी

बिबट्या की पट्टेरी वाघ? शेतकरी आणि वन कर्मचाऱ्यांत वाद

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
तालुक्यातील गर्भगिरी डोंगरपट्ट्यात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतवस्तीवरील नागरिकांची चिंता वाढली आहे. मोहरी शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे नर बिबट्या जेरबंद झाला. मात्र, परिसरात आणखी तीन बिबट्यांचा वावर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. दुसरीकडे, केळवंडी शिवारात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात बैल ठार झाला. हा हल्ला बिबट्याने नव्हे, तर पट्टेरी वाघाने केल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे. यावरून शेतकरी आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या वादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने बिबट्याच्या दहशतीत आता पट्टेरी वाघाच्या चर्चेची भर पडली आहे.

मोहरी येथील डोईफोडे बन वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. रात्री-अपरात्री बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. वारंवार मागणी करूनही बिबट्या पकडला जात नसल्याने ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याचा आग्रह धरला होता. अखेर बाबासाहेब नारायण डोईफोडे यांच्या घरालगत पिंजरा लावण्यात आला. रविवारी पहाटे पाच वाजण्यापूर्वी या पिंजऱ्यात एक नर बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी परिसरातील धोका कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांच्या दाव्यानुसार, पिंजऱ्यात एक बिबट्या अडकल्यानंतर आणखी दोन लहान आणि एक मोठा बिबट्या डोंगराच्या दिशेने निघून गेला. यापूर्वी या परिसरात बिबट्यांनी सहा कुत्र्यांचा फडशा पाडला असून, दोन शेळ्यांची करडेही पळविली आहेत. अलीकडेच एका कुत्र्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला होता. या परिसरात बिबट्या पकडण्याची ही अकरावी वेळ असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
बिबट्यांच्या भीतीने शेतवस्तीवरील नागरिकांनी स्वखर्चाने घराभोवती पाच फुटांपर्यंत संरक्षक कंपाउंड उभारले आहे. मात्र, बिबट्या सहजपणे त्यावरून उडी मारून घराच्या परिसरात येत असल्याने या उपाययोजनेचाही फारसा उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कंपाउंडची उंची किमान दहा फूट करण्याची मागणी होत आहे.परिसरात लहान मुले असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वन विभागाने आणखी पिंजरे लावून उर्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्राचार्य कल्पजीत डोईफोडे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास हंडाळ, इरफान पठाण, संजय बन, बाबासाहेब डोईफोडे, आजिनाथ डोईफोडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.



दरम्यान, केळवंडी शिवारात सोमवारी (दि.9) दुपारी अशोक बापूराव आठरे यांच्या शेतातील बैलावर वन्यप्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. मात्र, हल्ला करणारा प्राणी बिबट्या की पट्टेरी वाघ, यावरून शेतकरी आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.

शेतकऱ्याने हा प्राणी वाघ असल्याचा ठाम दावा केला, तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरून घटनास्थळी शाब्दिक चकमक उडाली. या वादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. वन विभागाने या परिसरात यापूर्वीच पिंजरा लावला असून, आता आणखी एक पिंजरा लावण्यासह वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरा बसविण्यात आला आहे. वनपरिक्षेत्राधिकारी मिलिंद गोवेकर आणि वन परिमंडळ अधिकारी बबन मंचरे यांनी ही माहिती दिली.दरम्यान, वन विभागाचे अप्पा घनवट, प्राणीमित्र सुशांत मनवरे, वनसेवक बाळू मरकड, अनिल अरगडे, बाळू चितळे आणि शिवनाथ जिवडे यांनी रेस्क्यू करून मोहरीत जेरबंद झालेल्या बिबट्याला सुरक्षितपणे स्थलांतरित केले.

50 हजार रुपये घ्या, पण वाघ पकडून न्या!
केळवंडीतील बैलावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून पट्टेरी वाघच असल्याचा शेतकऱ्याचा दावा आहे. याच मुद्द्यावरून वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. आम्ही काय बिबट्या पाहिला नाही का? आम्हाला माहिती आहे, बिबट्या कसा असतो. आमचे डोळे खोटे आहेत का? बैलाची नुकसान भरपाई देऊ नका; पण आमच्याकडून वैयक्तिक 50 हजार रुपये घ्या आणि वाघ पकडून न्या, अशा संतप्त शब्दांत शेतकऱ्याने आपली भूमिका मांडली. नुकसान भरपाईपेक्षा शेतवस्तीवरील नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता महत्त्वाची असल्याची भावना या उद्रेकातून व्यक्त होत आहे
Previous Post Next Post