*माईंच्या उपदेशाने विद्यार्थी भारावले*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती ) भद्रावती,दि.२०:-येथील लोकमान्य विद्यालयात खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रबोधन वर्गात माई रामप्रिया यांनी केलेल्या उपदेशाने विद्यार्थी भारावून गेले. येथील संत गजानन नगरातील संत गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त आयोजित शिवपुराण सप्ताहासाठी माई आल्या असता लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी उपदेश करण्याची विनंती केली. त्यानुसार माई लोकमान्य विद्यालयात आल्या व त्यांनी विद्यार्थ्यांना मो‌लाचे मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात माई म्हणाल्या की, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या कार्यामध्ये सदैव निरंतरता ठेवा.वेळेचे महत्व जाणून घ्या. चांगल्या मित्रांची निवड करा. आपल्या आई-वडिलांचा सन्मान करा. त्याचबरोबर प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था कशी मजबूत आणि भारताला विश्वगुरू बनविणारी होती, त्याचेही विश्लेषण केले. त्याचबरोबर थोर पुरुषांचे चरित्र वाचल्याने आणि चिंतन केल्याने त्यांचे गुण कसे अंगीकारल्या जाते याचेही विश्लेषण केले आहे. याप्रसंगी माई रामप्रिया यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार त्याचप्रमाणे शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार यांनी सत्कार केला. यावेळी लोकसेवा मंडळाचे सदस्य उमाकांत गुंडावार व पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे उपस्थित होते.

*माईंच्या उपदेशाने विद्यार्थी भारावले*.                        
Previous Post Next Post