*“मेरी पॉलिसी मेरे हाथ” उपक्रम कठोरे येथे उत्साहात*. (कठोरे (ता. चोपडा , जि. जळगाव): *भारतीय कृषी विमा कंपनीद्वारे राबविण्यात येणाऱ्या “मेरी पॉलिसी मेरे हाथ”* या उपक्रमांतर्गत कठोरे येथे शेतकऱ्यांना पिकविमा पॉलिसींचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ गावाचे ग्राम विकास अधिकारी श्री.नितीन मनोरे व सरपंच श्री.एकनाथ कोळी व पोलिस पाटील श्री. रत्नाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. समन्वयक म्हणून तालुका पिकविमा प्रतिनिधी रोहित धनगर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना पिकविमा योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरल्यानंतर त्यांच्या पॉलिसीची प्रत थेट हातामध्ये मिळावी, यासाठी सरकार व कृषी विमा कंपनी यांनी “मेरी पॉलिसी मेरे हाथ” हा उपक्रम राबविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कठोरे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमात बोलताना तालुका प्रतिनिधी रोहित धनगर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या विमा पॉलिसीची कागदपत्रे वेळेवर मिळाल्याने पारदर्शकता वाढेल. पिकनुकसान भरपाईसंदर्भात शंका राहणार नाहीत. विमा कवच, हमी रकम, नुकसान नोंद प्रक्रिया आणि दावा करण्याच्या अटी याबाबत प्रत्येक शेतकऱ्याला स्पष्ट माहिती मिळावी हा आमचा उद्देश आहे.” महत्त्वाचे मुद्दे मांडत पिकविम्याचे फायदे आणि नुकसानभरपाईची प्रक्रियाही स्पष्ट केली.श्री.रत्नाकर पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना शेतकरी कल्याणासाठी पिकविमा योजना किती आवश्यक आहे हे सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “सरकारची योजना शेवटच्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचली पाहिजे. पिकविमा हा आजच्या बदलत्या हवामानातील अनिश्चिततेमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे.”कार्यक्रमास गावातील अनेक शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच युवा कृषी उद्योजक उपस्थित होते. शेतकऱ्यांनी विमा पॉलिसी थेट हातात मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात शेतकरी हिताचे असे उपक्रम गावात सातत्याने राबविण्याची अपेक्षाही उपस्थितांनी व्यक्त केली.या उपक्रमामुळे कठोरे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना पिकविम्याच्या लाभांविषयी जागृती झाली असून विमा प्रक्रियेबाबत पारदर्शकता व विश्वास निर्माण झाला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0