३१ डिसेंबर (थर्टी फर्स्ट) व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध मद्यनिर्मितीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री. देशमुख यांनी दि. १३.१२.२०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार सह आयुक्त (अंमलबजावणी) अमरावती विभाग श्री. प्रसाद सुर्वे यांच्या आदेशान्वये व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अकोला श्रीमती सीमा झावों यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला यांनी जिल्ह्यातील बनावट देशी दारू निर्मितीचा मोठा कारखाना उध्वस्त करत ऐतिहासिक कारवाई केली आहे.दि. २१.१२.२०२५ रोजी प्राप्त गोपनीय माहितीनुसार मोळे-विचखेड ता. पातूर जि. अकोला येथील शेतशिवारातील एका अस्थायी शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ‘रॉकेट देशी दारू – संत्रा’ या ब्रँडच्या ९० मिली क्षमतेच्या ३५० खोक्यांमधील सुमारे ३५,००० प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या, तसेच मद्यार्क तयार करण्यासाठी वापरले जाणारे २०० लिटर क्षमतेचे ३५ प्लास्टिक ड्रम, एक मोटारसायकल व ट्रॅक्टरसह एक ढोली असा एकूण रु. २०,३२,११०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी जवान श्री. सुभाष गावंडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास निरीक्षक श्री. महेंद्र सोनार (अकोला) हे करीत आहेत.त्याचप्रमाणे कारवाईदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजे विचखेड, ता. पातूर येथील किसान पोल्ट्री फार्म येथील कुलूपबंद खोलीवर दारूबंदी कायद्यान्वये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी अवैध विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या ‘रॉकेट देशी दारू – संत्रा’ या ब्रँडच्या ९० मिली क्षमतेच्या ३०० खोक्यांमधील सुमारे ३०,००० प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत रु. १२,०१,५००/- इतकी आहे. या गुन्ह्यात जवान श्री. आकाश बरडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. भरतकुमार धुरट, भरारी पथक, अकोला हे करीत आहेत.दोन्ही कारवाईत मिळून एकूण ६५० बॉक्स बनावट देशी दारू व रु. ३२,३४,४९०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईची चाहूल लागताच घटनास्थळी उपस्थित असलेले संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम १५ (१)(ई), ८१, ८३ व १०८ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळाच्या जागेच्या मालकीबाबत माहिती मिळविण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांना व जप्त वाहनांच्या मालकीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.या यशस्वी कारवाईत निरीक्षक श्री. प्रमोद कांबळे, भरारी पथक अकोला तसेच जवान सर्वश्री विशाल बांवलकर, सुभाष गावंडे, योगेश सरप, रमाकांत मुंडे, आकाश बरडे, जयंत शेगोकार, वाहनचालक नरेश कास्देकर, प्रविण गजभार, राजेश खिराडे तसेच महिला जवान श्रीमती गीता भास्कर व वैष्णवी मोहन यांनी सहभाग घेतला.दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतूक यासंदर्भात नागरिकांनी कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२१३-१९९९, व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६३८८८१ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)

Previous Post Next Post