पाऊस कधी पडणार ?' शेतकरी राजाचा आभाळाला सवाल.

पाऊस कधी पडणार ?' शेतकरी राजाचा आभाळाला सवाल.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी देगलूर 

 देगलूर :खरीप हंगामाची
चाहूल लागल्यानंतर तालुक्यासह परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसले आहेत. जून महिना अध्यावर आला असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पेरणीपूर्व मशागतीची सर्व कामे पूर्ण करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत, मात्र आभाळाने अद्याप साथ न दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.यंदा खते, बियाणे, औषधे आणि मशागत खर्चात मोठी वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन बियाणे व खते खरेदी करून ठेवली आहेत काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसाच्या आशेवर शेतात पेरणी करण्याची तयारी केली होती, मात्र पावसाने दडी मारल्याने सर्व नियोजन कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, वखरणी आणि इतर मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आता फक्त चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशात ढगांची गर्दी होत असली तरी पाऊस मात्र हुलकावणी देत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दररोज हवामानाचा अंदाज पाहणे आणि आभाळाकडे नजर लावून बसणे, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
पावसाअभावी खरीप हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांपासून सतत बदलणारे हवामान, अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात यंदाही पावसाचा उशीर होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
'शेत तयार आहे, बियाणे तयार आहे, खते तयार आहेत; पण पाऊसच तयार नाही,' अशा शब्दांत अनेक शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. ग्रामीण भागात सर्वत्र एकच चर्चा ऐकायला मिळत आहे 'पाऊस कधी पडणार ?'
सध्या शेतकरी राजा आभाळाकडे आशेने पाहत असून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच चांगला पाऊस पडून खरीप हंगामाची सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post