भद्रावती तालुक्यात मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहीम; नागरिकांच्या सहभागाचे आवाहन – तहसीलदार राजेश भांडारकर

भद्रावती तालुक्यात मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहीम; नागरिकांच्या सहभागाचे आवाहन – तहसीलदार राजेश भांडारकर

 महेश निमसटकर 
 जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 


भद्रावती, दि. २६ जून २०२६ : लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम, पारदर्शक व विश्वासार्ह बनविण्यासाठी मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून नोंद सुनिश्चित करण्यात येणार असून अपात्र, दुबार अथवा चुकीच्या नोंदी वगळण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरभेटी घेऊन मतदारांच्या तपशीलांची पडताळणी करणार आहेत. स्थलांतरित, विसंगत किंवा दुबार नोंदींची तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या करण्यात येतील. तसेच पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

नागरिकांनी या प्रक्रियेस सहकार्य करून आपली माहिती तपासावी व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. घरभेटीदरम्यान गणना फॉर्मसाठी एक पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष बाबी :

- कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही.
- अपात्र अथवा अयोग्य नोंदी कायम ठेवण्यात येणार नाहीत.
- मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार.
- क्षेत्रस्तरावर माहितीची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार.
- नागरिकांच्या सक्रिय सहभागातून पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात येणार.

भद्रावती तालुक्यात एकूण १,३३,२७९ मतदार असून त्यापैकी १,१०,०१४ मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. सध्या मॅपिंगची प्रगती ८५ टक्के असून उर्वरित काम नियोजनानुसार पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. तसेच तालुक्यातील १७१ बीएलओमार्फत घरभेटींचे नियोजन करण्यात आले आहे.

मोहिमेचे वेळापत्रक :

- २० ते २९ जून : प्रशिक्षण व पूर्वतयारी
- ३० जून ते २९ जुलै : बीएलओ घरभेटी
- ५ ऑगस्ट : प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी
- ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर : दावे व हरकती स्वीकारणे
- ३ ऑक्टोबरपर्यंत : दावे व हरकतींचा निपटारा
- ७ ऑक्टोबर : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

मतदारांनी विहित कालावधीत आवश्यक दावे व हरकती नोंदवून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राजेश भांडारकर, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, भद्रावती यांनी केले आहे.
Previous Post Next Post