*ईश्वरपूरात अहिल्यामाता जयंतीनिमित्त जनशक्तीचे विराट दर्शन*
*गोपीचंद पडळकर यांचा स्वाभिमान, हक्क आणि समाज संघटनाचा निर्धार*
ईश्वरपूर | जिल्हा प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ईश्वरपूर येथे आयोजित भव्य शोभायात्रा आणि जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने समाजबांधव, माता-भगिनी आणि युवकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अहिल्यामातेच्या जयघोषाने संपूर्ण ईश्वरपूर नगरी दुमदुमून गेली असून हा सोहळा समाजशक्ती, स्वाभिमान आणि संघटनशक्तीचे विराट दर्शन घडवणारा ठरला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. न्यायनिष्ठा, लोकहित आणि सुशासनाची परंपरा जपणाऱ्या अहिल्यामातेचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पडळकर यांनी अहिल्यामातेचे भव्य स्मारक हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या उपकारातून नव्हे, तर समाजबांधव आणि माता-भगिनींच्या लोकवर्गणीतून स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच अहिल्यामातेच्या जन्मभूमी चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने मंजूर केलेला ₹१००० कोटींचा विकास आराखडा हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे नमूद करत आचारसंहिता संपल्यानंतर या कामांना वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
धनगर समाजाच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी प्रत्येक 'क' वर्ग तीर्थक्षेत्राला ₹५ कोटींचा निधी देण्याचा संकल्प करण्यात आल्याचे सांगत आरेवाडी देवस्थानासाठी प्रस्तावित ₹१५० कोटींचा विकास आराखडा शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करताना मेंढपाळ बांधवांवरील अन्याय, दडपशाही आणि जुलूमशाही यापुढे सहन केली जाणार नसल्याचा इशारा देत संविधानाने दिलेल्या हक्कांसाठी, एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि धनगर समाजाच्या न्याय्य अधिकारांसाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असे ठामपणे सांगितले. "ही पिढी केवळ तमाशा पाहण्यासाठी नाही, तर इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरली आहे," असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमास राज्यसभा खासदार रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते डॉ. अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, सम्राटबाबा महाडिक, माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध देवस्थानांचे संत, महंत, पुजारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते.

