नवापूरमध्ये पाच लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त; FDA व पोलिसांची धडक कारवाई...
प्रा. डी. सी. पाटील
नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक
शहादा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीवर नंदुरबारच्या अन्न व औषध प्रशासनाने आणि नवापूर पोलिसांनी मोठा घाव घातला. सुरत–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कुणाल हॉटेलजवळ संयुक्त पथकाने केलेल्या धडक कारवाईत सुमारे ₹5 लाख 20 हजार किमतीचा प्रतिबंधित विमल पान मसाला (सुगंधित तंबाखू) जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून सापळा, कंटेनर पकडला
FDA ला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अहमदाबादहून विजयवाड्याकडे मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची वाहतूक होत होती. माहितीच्या आधारे FDA व नवापूर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अशोक लेलँड कंटेनर (क्र. RJ 19 GK 1963) अडवला.
तपासणीत कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित विमल पान मसाल्याचा साठा आढळला. पथकाने संपूर्ण मुद्देमाल तात्काळ जप्त करून ताब्यात घेतला. या कारवाईमुळे अवैध तंबाखू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
FDA चा इशारा - कारवाया सुरूच राहणार
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाया सुरूच राहतील. नागरिकांनी अशा गैरप्रकारांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई FDA आयुक्त तुकाराम मुंढे व सहआयुक्त सपना गोडसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र डोले, नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.
पुढील कायदेशीर कारवाई सुरू
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.

