7 ऐवजी फक्त 3 शिक्षकांच्या भरवशावर 157 विद्यार्थी; शहाद्यातील निवासी शाळेचा भोंगळ कारभार विषबाधेतून उघड
(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील)
शहादा : शहरातील अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी शाळेत झालेल्या विषबाधा प्रकरणात 27 विद्यार्थ्यांवर दुसऱ्या दिवशीही उपचार सुरू आहेत. सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली व पालकांना दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
*काय घडले होते:
शनिवारी रात्री विद्यार्थ्यांना शेवगा, भात आणि चपाती असे जेवण देण्यात आले होते. जेवणानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. तातडीने त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अन्नाचे नमुने जप्त, स्वयंपाकगृह सील
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभाग आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने निवासी शाळेच्या स्वयंपाक गृहातील शिजवलेले अन्न व इतर साहित्य जप्त केले असून स्वयंपाकगृह सील करण्यात आले आहे. तसेच बाधित विद्यार्थ्यांचे रक्त आणि उलटीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
*7 शिक्षकांऐवजी केवळ 3 शिक्षकांवर शाळेचा भार:
या निवासी शाळेत एकूण 157 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेसाठी 7 शिक्षकांची पदे मंजूर असताना केवळ 3 शिक्षकांवरच संपूर्ण कारभार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सहाय्यक शिक्षक रोहिदास वळवी यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार आहे, तर समाजकल्याण व वसतिगृहाचे लिपिक कल्पेश माळी यांच्याकडे वॉर्डन पदाचा अतिरिक्त भार आहे. प्रत्यक्षात दोनच शिक्षक शाळा सांभाळत आहेत.
घटनेनंतर भीतीपोटी 30 विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडून घरी जाणे पसंत केले आहे. पालकांनी समाजकल्याण विभागाने तात्काळ रिक्त पदे भरावीत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
*नेत्यांकडून रुग्णालयात धाव, प्रशासनावर रोष:
रविवारी समाजकल्याण विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त महेश वाघ, नंदुरबारचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, भाजप अनुसूचित जाती आयोगाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पानपाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व घटनेबाबत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, संदीप वाघ, गणेश सूर्यवंशी, विनोद पाटील यांच्यासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
"निवासी शाळेतील प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल आणि रिक्त पदांची भरती तातडीने केली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले आहे.

