माहूर तालुक्यात 'मिशन वात्सल्य' अंतर्गत ३,१८३ एकल महिलांची नोंद. तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न.

माहूर तालुक्यात 'मिशन वात्सल्य' अंतर्गत ३,१८३ एकल महिलांची नोंद.

 तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न.

 (तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड माहूरगड)

      मिशन वात्सल्य माहूर तालुका समितीची महत्त्वपूर्ण बैठक काल दिनांक ७ जुलै २०२६ रोजी तहसीलदार अभिजित जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने रेशन व्यवस्था, संजय गांधी निराधार योजना आणि सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना यांसह इतर विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ एकल महिलांपर्यंत पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा या वेळी घेण्यात आला.
     माहूर तालुक्यामध्ये पूर्वी ३,०२८ एकल महिलांची नोंद होती. मात्र, नगर पंचायत प्रशासनाच्या  प्रयत्नांमुळे आता शहरासह तालुक्यात एकूण ३,१८३ एकल महिलांची नोंद झाल्याची ताजी आकडेवारी या बैठकीत स्वीकारण्यात आली आहे.
   एकल महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक नवीन कायदा प्रस्तावित असून, त्यांच्या वेदना आणि समस्या सोडवण्यासाठी प्रभावी कायदा प्रस्तावित आहे.या संदर्भातील मसुदा समितीला आपल्या सूचना कळवण्याबाबत सर्वसामान्य नागरिक व संबंधित संघटनांना माहिती देण्यात येणार आहे, जेणेकरून एक सर्वसमावेशक कायदा तयार होण्यास मदत होईल.
       माहूर तालुक्यामध्ये विधवा, घटस्फोटीत व परितक्त्या महिलांच्या मदतीसाठी 'मिशन वात्सल्य समिती' तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. या समितीमध्ये सर्व विभाग प्रमुख हे सदस्य असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अधिकारी हे सचिव म्हणून कार्यरत आहेत. कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी व मदतीसाठी संबंधित महिलांनी या समितीवरील शासकीय अधिकारी किंवा अशासकीय सदस्य **मनोज कीर्तने** व **प्रल्हाद चव्हाण** यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
     या महत्त्वपूर्ण बैठकीला 
तहसीलदार अभिजित जगताप (अध्यक्ष),
 नायब तहसीलदार अरुणाताई सूर्यवंशी व के. व्ही. श्रोते,मुख्याधिकारी व्ही. बी. कांदे
 सि. डी. पी. ओ. पातेवार जी. व्ही.,बीईओ प्रतिनिधी जी. बी. बिरमवार,महसूल सहाय्यक व्ही. डब्ल्यू. पांढरे,पुरवठा निरीक्षक जी. बी. मिरजगावे,अशासकीय सदस्य मनोज कीर्तने व प्रल्हाद चव्हाण,संरक्षण अधिकारी एस. व्ही. कदम,बीएमएम पांडुरंग आत्राम,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. माचेवार सह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post