बोगस बियाण्यांमुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात तात्काळ नुकसानभरपाई द्या.आ.अंतापूरकरांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी.

बोगस बियाण्यांमुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात तात्काळ नुकसानभरपाई द्या.

आ.अंतापूरकरांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी.

(माहेमूद पिंजारी 
तालुका प्रतिनिधी देगलूर)

देगलूर: देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासह राज्यातील अनेक भागांत खरीप हंगामात बोगस व निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्यावर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आ. अंतापूरकर यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आ. अंतापूरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने विविध पिकांची पेरणी केली. मात्र बोगस व निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे अनेक ठिकाणी उगवण अत्यंत कमी झाली किंवा झालीच नाही. परिणामी शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्चाचा मोठा बोजा सहन   करावा लागत आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा, मजुरीचे वाढलेले दर आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
कृषी विभागाकडून बियाण्यांच्या गुणवत्तेची प्रभावी तपासणी आणि बाजारपेठेवर आवश्यक नियंत्रण न ठेवल्यामुळे बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा प्रकार केवळ निकृष्ट बियाण्यांचा नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाशी आणि त्यांच्या उपजीविकेशी झालेला गंभीर अन्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात बुस्टर, रवी सिड्स, विगोर.ग्रिनगोल्ड, ओसवाल सिड्स, पार्श्व सिड्स, बुस्टर प्लान्ट जेनेरिक्स, ग्रीन टीप सिड्स, सफल सिड्स, पार्शर जेनेटिक्स, श्री श्री सिड्स आणि हायरिच (Hirich) या कंपन्यांच्या बोगस किंवा निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणी करावी लागलेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ विशेष आर्थिक मदत जाहीर करून ती दुबार पेरणीसाठी आवश्यक असलेली उच्च दर्जाची, प्रमाणित आणि उगवणक्षम बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावीत.दोषी बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, परवाने रद्द करावेत आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई संबंधित कंपन्यांकडून वसूल करून बाधित शेतकऱ्यांना द्यावी. 'शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बोगस बियाण्यांमुळे झालेले नुकसान हे केवळ आर्थिक नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, 'अशी ठाम मागणी आ. अंतापूरकर यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
Previous Post Next Post