शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनाची विशेष मोहीम◾९० टक्क्यांपर्यंत अनुदानाची संधी

शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनाची विशेष मोहीम

◾९० टक्क्यांपर्यंत अनुदानाची संधी

(माहूर : तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड माहूरगड )

प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'प्रति थेंब अधिक पीक' या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती माहूर तालुका कृषी अधिकारी ए.एम.यलपलवाड यांनी दिली आहे.

 या विशेष मोहिमेद्वारे पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर सूक्ष्म सिंचनासाठी अर्ज करून शासनाकडून ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभियानाचा उद्देश अधिकाधिक शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करून पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविणे आणि शेतीची उत्पादकता वाढविणे हा आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील गावागावांत विशेष शेतकरी मेळावे, जनजागृती कार्यक्रम तसेच अर्ज भरण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना योजनेची सविस्तर माहिती देऊन अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालय, माहूर येथे संपर्क साधून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन माहूर तालुका कृषी अधिकारी ए.एम.यलपलवाड यांनी केले आहे.

Previous Post Next Post