बोगस दिव्यांग प्रमाणपत्र उघडकीस; पाथर्डीतील शिक्षकासह चौघे अटकेत

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र उघडकीस; पाथर्डीतील शिक्षकासह चौघे अटकेत


(अहिल्यानगर विभागीय संपादक/प्रशांत बाफना)


शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग प्रवर्गाचा लाभ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातून (सिव्हिल हॉस्पिटल) बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाथर्डीतील शिक्षकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक देविदास जयकर यांच्या फिर्यादीवरून सोलापूर शहर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, अहिल्यानगर येथील पाटबंधारे विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या राजेश भाऊसाहेब जाधव यांनी प्रथम जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर ते अपात्र ठरल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.त्यानंतर आरोपींनी संगनमत करून सोलापूरचा बनावट पत्ता असलेले आधारकार्ड तयार केले व 11 मे 2026 रोजी युडीआयडी प्रणालीद्वारे सोलापूर येथून ऑनलाइन अर्ज दाखल केला. पोलिसांच्या तपासानुसार, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी न करताच 20 मे 2026 रोजी 45 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले. हे प्रमाणपत्र संबंधित शासकीय विभागात सादर करून नोकरीचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.

दिव्यांग संघटनांकडून तक्रारी आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालात वैद्यकीय तपासणी न करताच प्रमाणपत्र जारी झाल्याचे समोर आल्यानंतर संबंधित प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व भरत चंदनशिव यांच्या पथकाने राजेश भाऊसाहेब जाधव (कनिष्ठ लिपिक), महेश दिनकर बारगजे, राजेश रमाकांत ढवण (निवृत्त रुग्णालय कर्मचारी) आणि पाथर्डी येथील शिक्षक विजय बाबासाहेब गर्जे यांना अटक केली आहे.प्राथमिक तपासात बोगस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान आरोपींकडून दोन ऑल-इन-वन संगणक, की-बोर्ड, माऊस, अडॅप्टर तसेच चार मोबाईल फोन असा सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या विजय गर्जे आणि राजेश ढवण यांना न्यायालयासमोर हजर केले असता, पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
Previous Post Next Post