शहादा येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात संपन्न
नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील
शहादा : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सांस्कृतिक विभागातर्फे नंदुरबार जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात उत्साहात करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, "केवळ पुस्तकी शिक्षण अथवा मिळवलेले गुण तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकतात, परंतु आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षणासोबत अभ्यासेतर उपक्रमांची साथ अत्यंत गरजेची असते."
या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावी वयोगटातील 46 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी केवळ मनोरंजनावर भर न देता मोबाईलचे वाढते व्यसन, सोशल मीडियाचा अतिवापर, वाढती बेरोजगारी, पर्यावरण ऱ्हास आणि माणुसकी यांसारख्या सामाजिक विषयांवर आपल्या अभिनयातून प्रकाश टाकला. अनेक बालकलाकारांनी आजच्या युवा पिढीची मानसिक ओढाताण आणि डिजिटल जगातील एकाकीपणा यावर अत्यंत मार्मिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व जायंट्सचे ज्येष्ठ पदाधिकारी मानकभाई चौधरी यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी परीक्षक म्हणून श्री. शशिकांत नागरे (धुळे) व सौ. आकांक्षा कांत (नाशिक) उपस्थित होते. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रशेखर सुतार, डॉ. प्रशांत तोरवणे, डॉ. भरत चौधरी व श्री. उज्वल पवार यांनी केले. या यशस्वी उपक्रमाबद्दल मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूरभाई पाटील आणि प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी सर्व सहभागी विद्यार्थी व संयोजकांचे कौतुक केले.
स्पर्धेचा निकाल:
प्रथम क्रमांक: लावण्या प्रसाद माळी (श्रीमती ही. गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार)
द्वितीय क्रमांक: युविका चंद्रशेखर सुतार (महावीर इंग्लिश मीडियम स्कूल, शहादा)
तृतीय क्रमांक: स्वरा प्रसाद कासार (व्हॅलंटरी प्रायमरी स्कूल, शहादा)
उत्तेजनार्थ पारितोषिके:
प्रथम: पूर्वी गिरीश महाले (व्हॅलंटरी माध्यमिक महिला मंडळ स्कूल, शहादा)
द्वितीय: रुद्राणी अनिल ठाकरे (श्री सातपुडा विद्यालय, लोणखेडा)
तृतीय: कनिष्का सूर्यवंशी (जगमा वर्ल्ड स्कूल, खेड दिगर)
चतुर्थ: तनुष्का सदाशिव बागुल (श्री सातपुडा विद्यालय, लोणखेडा)

