उकाड्यामुळे गच्चीवर झोपले अन् चोरट्यांनी डाव साधत अडीच लाखावर मारला डल्ला. ;नंदुरबार मधील घटना (नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी): उकाड्याने बेजार झाल्यामुळे येथील शिक्षक कुटुंब गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी डाव साधत घराच्या मुख्य दरवाजाची कडी उघडून घरातील सुमारे दोन लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेल्याची घटना जयंतीलाल नगर भागात गुरुवारी पहाटे घडली. याप्रकरणी शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वाढत चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील भोणे रस्त्यावरील असलेल्या जयंतीलाल नगर मध्ये जयेश राजेंद्र पाठक हे शिक्षक प्लॉट नंबर ४८ मध्ये राहतात. वाढत्या उकाड्यामुळे त्यांचे कुटुंब घराच्या गच्चीवर झोपले होते. चोरट्यांनी ही संधी साधत त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. पहाटे साडेचार वाजता पाठक हे उठून खाली आले असता त्यांना दरवाजाची कडी लावलेली दिसली मात्र कुलूप दिसले नाही. आई कुलूप लावण्यास विसरली असेल असा समज करून ते घरात गेले असता त्यांना बेडरूममधील कपाट उघडे दिसले तसेच सामान अस्ताव्यस्त पसरलेला दिसला. लागलीच त्यांनी आई व पत्नीला खाली बोलावले असता तिघांना चोरी झाल्याची खात्री झाल्याने पाठक यांनी पोलिसांना कळविले. शहर पोलिसांनी पंचानामा केल्यानंतर जयेश पाठक यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले एक लाख २० हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाची सोन्याची माळ, १५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, सहा हजार रुपये किमतीची दोन सोन्याच्या अंगठ्या, साडेसात हजार रुपये किमतीचे चेन व अंगठी, ७२ हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे तुकडे, एक हजार रुपये किमतीची चांदीचे वाळे आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी नेल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. गुंजाळ करीत आहे. दरम्यान, शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी येथील वाघेश्वरी मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडली. पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडले, दर एक दिवसाआड दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी शहरवासीयांमध्ये नाराजीचे वातावरण असून चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

