शहादा तालुक्यातून साडेतीन लाख रुपयांच्या विजेच्या तारा लंपास; गुन्हा नोंद होवूनही पोलिसांचे दुर्लक्ष... (शहादा (जिल्हा प्रतिनिधी): शहादा तालुक्यातील वैजाली, कलमाडी, कोठली व परिसरातून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या वीज तारा चोरून नेल्याची घटना घडली. गत दहा दिवसांत विविध ठिकाणी वीज तारा चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलिस तपास संथ गतीने होत आहे. वैजाली, कलमाडी, कोठली व परिसरातील एका घटनेत चोरट्यांनी दोन लाख ३६ हजार रुपये किमतीची, १२ हजार ९८० रुपये किमतीची ॲल्युमिनियमची तार आणि सहा हजार रुपये किमतीचे तीन सिमेंट पोल तर दुसऱ्या घटनेत एक लाख २८ हजार रुपये किमतीची साडेसहा हजार मीटर तार चोरट्यांनी चोरून नेली. तपास हवालदार रामा वळवी करीत आहेत. सध्या पपई, केळी व कापूस पिकांच्या लागवडीची धावपळ शेतकरी वर्गात सुरू आहे. शेतीसाठी फक्त आठ तास वीज पुरवठा होत असल्याने रोपांना वाचविण्यासाठी शेतकरी पाण्याचे नियोजन करीत आहे. त्यात वीज तारा चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वीज मंडळासह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिस प्रशासनाने या चोरीला आळा घालण्यास चोरीचा माल घेणाऱ्यांनाही जेरबंद करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post Next Post