महापुरुषांच्या विचारांशी छेडछाड नको : रामदास पाटील.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
देगलूर तालुक्यातील केदारकुंठा येथे (ता. ३० एप्रिल) रोजी केदारकुंठा गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेमभावणेने साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी लवकर ग्रामस्थांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर गावातील माजी सरपंच माधवराव आनंदराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अति उष्णता असल्याने मिरवणूक रद्द करून सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देण्यात आली. सकाळी ध्वजारोहण वेळी तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय भीमच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या प्रमुख भागात ध्वजारोहणाचे अध्यक्ष म्हणून विश्वनाथ आनंदराव पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचबरोबर मुलांची भाषणे सादर करताना अन्वयी गौतम बोने यांनी बक्षीस प्राप्त केले. यावेळी गावातील जेष्ठ आनंदराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण रामदास पाटील सुमठाणकर जयंतीनिमित्त आपल्या भाषणात बोलत असताना समाजात वाढत चाललेल्या दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त करत, महापुरुषांच्या विचारांचं विद्रुपीकरण थांबवण्याची गरज अधोरेखित केली. रामदास पाटील म्हणाले की, आजच्या काळात काही व्यक्ती किंवा गट आपल्या स्वार्थासाठी म हापुरुषांच्या विचारांचा चुकीचा अर्थ लावून समाजात पसरवत आहेत. यामुळे तरुण पिढी गोंधळून जाते आणि मूळ विचारांपासून दूर जाते. महापुरुषांनी दिलेले संदेश हे समाजघडणीसाठी होते, त्यांचा वापर वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी होऊ नये, असे ते म्हणाले.

