*अन् उच्च शिक्षित पोलिस शिपायाने वाढदिवसाच्या दिवशीच सोडले प्राण* *प्रवीणच्या मृत्यूने हळहळले पूर्ण भद्रावती शहर*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,दि.१ :-एका तरुण पोलिस शिपायाचा त्याच्या वाढदिवशीच वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी मृत्यू झाल्याने संपूर्ण पोलिस दलासह भद्रावती शहर हळहळले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील सुरक्षा नगरमधील रहिवासी आणि आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त कर्मचारी शालीक गोन्नाडे यांचा लहान मुलगा प्रवीण सन २००८ मध्ये पोलिस दलात भरती झाला. त्यावेळेस तो एम.ए.(राज्यशास्त्र), बी.एड. शिक्षण घेतलेला होता. तसेच तो एम.फील. करीत होता. प्राध्यापक होण्याचे स्वप्न तो उराशी बाळगून होता. त्यासाठी त्याने खूप प्रयत्नही केले. परंतु अचानक त्याने पोलिस शिपाई पदासाठी परीक्षा दिली आणि त्यात तो उत्तीर्ण होऊन सदर पदासाठी पात्र ठरला. लगेच त्याला नियुक्ती पत्र देण्यात आले अन् तो पोलिस दलात रुजू झाला. त्याचे पोलिस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची उमरी(पोतदार) येथील पोलिस स्टेशनमध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर माजरी, वरोडा येथे बदली झाली.प्रवीण हा उच्च शिक्षित आणि सुस्वभावी असल्याने कोणत्याही अधिकाऱ्याला त्याची आवश्यकता भासत होती. त्यामुळे वरोडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात त्याने बरेच दिवस आपले कर्तव्य बजावले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी चिमूर पोलिस स्टेशनला बदली झाली. चिमूर येथे कार्यरत असतानाच नियतीने मोठा डाव खेळला. दिवाळीमध्ये बहिणी भाऊबीज ओवाळणीकरिता भद्रावती येथे आल्याने तोसुद्धा दुचाकी वाहनाने भद्रावती येथे यायला निघाला. दरम्यान, सालोरी गावालगतच्या वळणावर जंगली प्राणी आडवा आल्याने प्रवीण डोक्याच्या भारावर पडून जखमी झाला. त्याला लगेच नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून तो कोमात गेला होता. सुरक्षा नगर येथील आपल्या निवासस्थानी राहून तो वैद्यकीय उपचार घेत होता. दरम्यान,दि.३१ मार्च रोजी सकाळी ६ वाजता प्रवीणची प्रकृती गंभीर झाली. त्याला रुग्णवाहिकेतून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणवायूची पातळी एकदम खालावल्याने त्याचा मृत्यू झाला.विशेष म्हणजे ३१ मार्चलाच त्याचा ४१ वा वाढदिवस होता. त्याच्या अकाली जाण्याने संपूर्ण पोलिस दलासह भद्रावती शहर हळहळले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील आणि भाऊ असा आप्त परिवार आहे. येथील पिंडोणी स्मशानभूमीत प्रवीणवर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी, पोलिस विभागातील कर्मचारी, शहरातील नागरिक आणि आप्तेष्ट उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत विवेकानंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक बी.एन.शेंडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक रुपचंद धारणे, श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते गुणवंत कुत्तरमारे आणि विशाल गावंडे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच दोन मिनिटे मौन पाळून प्रवीणला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अन् उच्च शिक्षित पोलिस शिपायाने वाढदिवसाच्या दिवशीच सोडले प्राण*  *प्रवीणच्या मृत्यूने हळहळले पूर्ण भद्रावती शहर*.                                                                      
Previous Post Next Post