माजरीच्या जंगलात लाकूड माफियांचा थैमान; पर्यावरणाची होत आहे कत्तल.संरक्षण कायदा फक्त कागदोपत्रीच! (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.15 :- माजरी परिसरातील पर्यावरण दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा मोहिमा राबवत असताना दुसरीकडे याच परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून पर्यावरण संरक्षण कायदा 1986 फक्त कागदोपत्रीच उरल्याचे चित्र दिसून येत आहे. पर्यावरण म्हणजे आपल्याला वेढून असलेल्या सजीव-निर्जीव घटकांचे एक समतोल संजाळ, ज्यात माती, पाणी, प्राणी, झाडे आणि हवामान यांचा समावेश होतो. याचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनासोबत नागरिकांचीही आहे. परंतु सध्याच्या माजरीतील वास्तव याच्या उलट आहे. वेकोलीच्या खाणी आणि त्याच्याशी संबंधित कंत्राटी कंपन्यांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर आणि स्थानिक नागरिक वास्तव्यास आहेत. भरगच्च पगार मिळवूनही अनेकजण आपल्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने सरपणासाठी लाकडे गोळा करून वापर करत आहेत. यासाठी जंगलातील झाडांची सर्रास कत्तल केली जात असून त्यात जातिवंत व दुर्मिळ वृक्षप्रजातींचाही समावेश आहे. याशिवाय स्वयंपाक, खाद्यपदार्थांची विक्री, आंघोळीसाठी गरम पाणी अशा विविध कारणांसाठी लाकडाचा वापर प्रचंड प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात धूर, वायू प्रदूषण आणि वनसंपत्तीचा ऱ्हास वाढत चालला आहे. पूर्वी कोळसा चोरीमुळे वेकोलीत सुरक्षा वाढविण्यात आली होती. त्यानंतर या चोरांमध्ये "लाकूडतोड तस्करी" हा नवा व्यवसाय उभा राहिला आहे. या गैरप्रकारात स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या युवकांचा सहभाग असल्याची माहितीही पुढे आली आहे. झाडांची तोड करून बाहेरगावी लाकडे विकली जात आहेत, जे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. अशा परिस्थितीत वनविभाग, स्थानिक प्रशासन किंवा पर्यावरणीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसून कायदा फक्त कागदांपुरता मर्यादित राहिला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आता तरी जबाबदारीने पावले उचलण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आणि प्रशासनाने संयुक्तरीत्या काम केल्यासच निसर्गाचे रक्षण शक्य होईल. अन्यथा भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

माजरीच्या जंगलात लाकूड माफियांचा थैमान; पर्यावरणाची होत आहे कत्तल.संरक्षण कायदा फक्त कागदोपत्रीच!                                                                 
Previous Post Next Post