मरखेल येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग व जीवे मारण्याची धमकी; दोन आरोपी अटकेत.
पिंजारी महेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर नांदेड
देगलूर :देगलूर तालुक्यातील
मरखेल येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून त्रास देणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मरखेल पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मरखेल पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२६ नुसार, फिर्यादी कु. अंबिका (वय १३ वर्षे) हिने दिलेल्या तक्रारीवरून संदीप बालाजी सुरवार (रा. मरखेल) आणि मुस्तफा मामूद उडगीरकर (रा. मरखेल) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५(२), ७८(२), ३५१(२), ३(५) तसेच पोस्को कायदा कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोर्पीनी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास दिला. तसेच फिर्यादीच्या घरासमोर येऊन वाईट उद्देशाने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतरही आरोपींकडून सतत पाठलाग करण्यात आला. याबाबत कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच मरखेल पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक रवी माधवराव हुंडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर आरोपींचा शोध घेऊन २२ जून २०२६ रोजी पहाटे १.४४ वाजता दोन्ही आरोर्पीना अटक करण्यात आली.या प्रकरणाचा पुढील तपास मरखेल पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असून, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व छेडछाडीच्या घटनांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

