अमली पदार्थाच्या समुळ उच्चाटनासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी पुढे यावे
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन संपन्न
दि.26/6/2026 भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या देशाकडे सर्वात जास्त तरुण शक्ती आहे, त्या देशाचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असायला हवे. परंतु, आज तरुण शक्तीला व्यसनाधीनतेची एक भयानक कीड लागली आहे. ही कीड आपल्या देशाला आतून पोखरत चालली आहे. यामुळे स्वत:वर, कुंटूंबावर व समाजावर मोठा परिणाम होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी अमली पदार्थाच्या समुळ उच्चाटनासाठी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रमात केले.
आतंरराष्ट्रीय अमली पदार्थ दिनानिमित्त पोलिस विभागाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी चौक येथून पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला व रॅलीमध्ये सहभागी होऊन स्वाध्याय मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, कस्तुरबा हॉस्पीटलचे डॉ.इंद्रजीत खांडेकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आदी मंचावर उपस्थित होते.
पोलिस पाटील हा ग्रामीण भागातील मोठा घटक असून गांजा उत्पादन हे ग्रामीण भागात होत असते. गावांमध्ये गांजाचे उत्पादन होत असल्यास तात्काळ पोलिस प्रशासनाला पोलिस पाटीलांनी माहिती द्यावी. राज्य शासनाच्या निर्णयान्वये आता पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी अमली पदार्थ्यांच्या सेवन विक्रीत सहभाग नोंदविल्यास त्यांच्यावर निलंबनासोबतच बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
आजच्या युवा पिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवणे व सायबर गुन्ह्यावर आळा बसविण्याचे गृह विभागाकडे मोठे आव्हान आहे. यासाठी समाजातील सर्व नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करुन अमली पदार्थाला नकार देऊन समृध्द व विकसनशील भारत बनविण्यास मदत करुया, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
दारू, सिगारेट, तंबाखूपासून सुरू झालेला हा प्रवास आज ड्रग्ज (अमली पदार्थ) सारख्या जीवघेण्या व्यसनांपर्यंत पोहोचला आहे. फॅशन किंवा मित्रांच्या आग्रहाखातर सुरू झालेली एक छोटीशी चूक कधी जीवघेणे व्यसन बनते, हे समजतही नाही. त्यामुळे तरुणांनी व्यसनाचा आनंद घेण्यापेक्षा चांगल्या गोष्टींचा आनंद घेणे शिकावे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या.
व्यसन माणसाला सुखाचा आभास निर्माण करून देते पण शेवटी फक्त आणि फक्त विनाशच देते. व्यसनामुळे केवळ एका व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होत नाही, तर त्याचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येते. आई-वडिलांचे स्वप्न, मुलांचे भविष्य आणि घराची शांतता एका झटक्यात नष्ट होते. आज वाढते गुन्हे, अपघात आणि कौटुंबिक हिंसाचार यामागे व्यसनाधीनता हेच सर्वात मोठे कारण आहे. अशा या अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी आपली जबाबदारी समजून पोलिस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन सौरभ अग्रवाल यांनी केले.
यावेळी इंद्रजीत खांडेकर यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी अमली पदार्थ जनजागृती रॅली मध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यक्रमस्थळी उपस्थिती दर्शविली. रॅलीमध्ये पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, एनसीसी, होमगार्ड, पोलिस पाटील, सेवानिवृत्त पोलिस, पोलिस बाईज, परीचारिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

